
अल्पवयीन तरुणावर जीवघेणा हल्ला; सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावच्या हद्दीत DIAT गेट जवळ भर रस्त्यावर थरार; गंभीर जखमी तरुणावर उपचार सुरू
अल्पवयीन तरुणावर जीवघेणा हल्ला; सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावच्या हद्दीत DIAT गेट जवळ भर रस्त्यावर थरार; गंभीर जखमी तरुणावर उपचार सुरू
खडकवासला: सिंहगड रस्त्यावरील खडकवासला गावच्या हद्दीत खडकवासला धरणालगत DIAT गेट पासून काही अंतरावर अल्पवयीन तरुणावर अज्ञात अंदाजे पाच ते सहा हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नकुल भीमा चव्हाण (वय अंदाजे 17 वर्ष, रा. लमाणवस्ती, खडकवासला) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खडकवासला नवीन चौपाटीजवळ भर रस्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी दहशत माजवत हा हल्ला केल्याने नव्याने आलेल्या पुणे शहर पोलीसांना गुन्हेगारांनी आव्हान देत हे कृत्य केल्याने नांदेड सिटी पोलीस याबाबत काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे अनेक खाद्यपदार्थ विक्रेते आहेत मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. तसेच घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. काही अंतरावर DIAT मुख्य गेट समोर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र तेथील वीज घटना घडण्याच्या काही तासांपासून गेलेली होती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही मात्र नांदेड सिटी पोलीसांचे अधिकारी व कर्मचारी आरोपींची ओळख पटविण्यासाठी व शोधण्यासाठी तातडीने रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे.