
शांततेचा भंग केल्यास आता गाठ शहर पोलीसांशी; आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नांदेड सिटी पोलीसांचा रुटमार्च
शांततेचा भंग केल्यास आता गाठ शहर पोलीसांशी; आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नांदेड सिटी पोलीसांचा रुटमार्च
किरकटवाडी: काही दिवसांवर आलेल्या होळी, धुलीवंदन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती व रमजानच्या पार्श्वभूमीवर नांदेड सिटी पोलीस स्टेशन कडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने रुटमार्च घेण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशांनुसार झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार व नांदेड सिटी पोलीस स्टेशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली हा रुटमार्च घेण्यात आला.
सिंहगड रस्त्यावरील जयप्रकाश नारायण नगर येथून सुरुवात करत किरकटवाडी फाटा, किरकटवाडी गाव, कोल्हेवाडी, लमाणवस्ती, खडकवासला गावठाण, खडकवासला धरण चौपाटी या भागात हा रुटमार्च घेण्यात आला.

पोलीस निरीक्षक अतुल भोस, दोन पोलीस अधिकारी, 22 अंमलदार, 15 होमगार्ड व आरसीपी क्र.3 चा स्टाफ या रुटमार्चमध्ये सहभागी झाला होता. हद्दीतील विविध मंडळे व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शांततेत सणसमारंभ साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर कोणी समाजकंटकांनी या दरम्यान गुन्हेगारी कृत्य करुन शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्याकडून सांगण्यात आले.