
खाजगी विकसकांच्या जागेला ‘पानशेत डॅम व्हिव’ मिळावा म्हणून पाटबंधारे विभागाच्या पायघड्या? आंबेगाव खुर्द येथील तीन शेतकऱ्यांची घरे पाडली; कारवाई वेळी दोन्ही खाजगी व्यक्ती तेथे उपस्थित असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
खाजगी विकसकांच्या जागेला ‘पानशेत डॅम व्हिव’ मिळावा म्हणून पाटबंधारे विभागाच्या पायघड्या? आंबेगाव खुर्द येथील तीन शेतकऱ्यांची घरे पाडली; कारवाई वेळी दोन्ही खाजगी व्यक्ती तेथे उपस्थित असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
पानशेत: पानशेत धरणालगत आंबेगाव खुर्द (ता. वेल्हे) येथील तीन शेतकऱ्यांची घरे पाटबंधारे विभागाने अतिक्रमण म्हणून कारवाई करत जमिनदोस्त केली आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून दोन व्यक्तींनी जमिन खरेदी केली असून त्यांना खाली ‘पानशेत डॅम व्हिव’ मिळावा म्हणून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ही कारवाई केली आहे असा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित दोन खाजगी व्यक्ती ही कारवाई सुरू असताना तेथे उपस्थित असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
आंबेगाव खुर्द येथील शेतकऱ्यांच्या जमिनी पानशेत धरणात गेलेल्या असून त्यांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात आलेले आहे. काही नागरिकांनी आपली जुनी वस्ती व वहिवाट तशीच ठेवलेली. या भागात मागील काही वर्षांपासून फार्महाऊस, रिसॉर्ट यासाठी जागेला मागणी वाढली आहे. अनेक अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक यांनी पानशेत परिसरात ‘डॅम व्हिव’ असलेल्या जागा विकत घेतल्या आहेत. अनेकांनी वरच्या भागात जागा खरेदी करुन खाली पाण्यापर्यंत पाटबंधारे विभागाच्या जागेत ताबा मारलेला आहे. हे सर्व राजरोसपणे सुरू असून पाटबंधारे विभागाचे अधिकारी यात सामील असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
अशाचप्रकारे अनंत कडू व त्यांच्या चुलत्यांच्या वस्तीच्या वरच्या भागात दोन खाजगी विकासकांनी दोन ते अडीच एकर क्षेत्र खरेदी केले आहे. कडू यांच्या म्हणण्यानुसार त्या जागेवाल्यांचा डोळा पाटबंधारे विभागाच्या जागेवर असून ते
त्यांना धरणापर्यंतची जागा ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली असून काही महिन्यांपूर्वी नोटीसा पाठविण्यात आल्या व परवा अचानक कोणी नसताना घरे पाडून जमिनदोस्त करण्यात आली आहेत. धक्कादायक म्हणजे संबंधित विकसक या कारवाई वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावा शेतकरी करत असल्याने पाटबंधारे विभागाचा हेतू स्वच्छ नसल्याचे दिसून येत आहे.
शेकडो अतिक्रमणे मग कारवाई येथेच का?
पानशेत, वरसगाव, खडकवासला या धरणांच्या दुतर्फा हजारो फार्महाऊस, रिसॉर्ट, हॉटेल्स बांधण्यात आलेले असून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून थेट पाण्यापर्यंत ताबा मारण्यात आलेला आहे. या सर्व गोष्टी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसत आहेत परंतु त्यांनी त्याकडे पाहू नये म्हणून संबंधित व्यक्ती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना अपेक्षित ‘नजराणा’ देत आहेत. त्यामुळे कोणावरही कारवाई होताना दिसत नाही. असे असताना केवळ आंबेगाव खुर्द येथील शेतकऱ्यांची घरेच का पाडण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातून पाटबंधारे विभागाची मानसिकता दिसून येत आहे.
“पिढ्यानपिढ्या आम्ही येथे राहत असून भातशेती करुन उदरनिर्वाह करत आहोत. आम्ही कसत असलेल्या जागेच्या आजूबाजूची जागा रिसॉर्ट व बोटींग सुरू करण्यासाठी दोन लोकांनी घेतली आहे. ते लोक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आम्ही कसत असलेल्या व राहत असलेल्या जागेवर ताबा मारण्याचा प्रयत्न करत आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारीही पूर्णपणे ते लोक सांगतील तसं काम करत आहेत. सरकारने याबाबत दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी.” अनंत कडू, रहिवासी, आंबेगाव खुर्द.