
अवैध धंद्यांची ‘MIDC’ आता ग्रामीण भागात विस्तारणार? ग्रामीण भागातील तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त होणार?
अवैध धंद्यांची ‘MIDC’ आता ग्रामीण भागात विस्तारणार? ग्रामीण भागातील तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त होणार?
सिंहगड: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील काही गावे पुणे शहर आयुक्तालयातील नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहेत. पुणे शहर पोलीसांनी अवैध धंद्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केल्याने संबंधित अवैध धंदेवाल्यांची पळापळ झाली असून अनेकांनी आपला गाशा गुंडाळला आहे. तर निमंत्रीतांनी ग्रामीण हद्दीत ‘स्टार्टअप’ सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू केल्याने आता अवैध धंद्यांची ‘MIDC’ ग्रामीण भागात विस्तारतेय की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, नांदोशी व सणसनगर ही गावे नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत समाविष्ट करण्यात आली असून शहर पोलीसांनी अवैध धंदे बंद करण्याची तंबी संबंधितांना दिली आहे. तसेच धडक कारवाया सुरू केल्या आहेत. पुणे ग्रामीण हद्द असताना राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे पुणे शहर पोलीसांच्या धाकाने बंद होत आहेत तर काहींचा चोरुन-लपून कार्यक्रम सुरू आहे. सेटलमेंट होत नसल्याने अवैध धंद्यावाले सैरभैर झाले आहेत.
परिणामी अवैध धंदेवाल्यांनी आपला मोर्चा आता सुरक्षित हद्दीकडे वळविण्यास सुरुवात केली असून गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, खानापूर या भागात चाचपणी सुरू आहे. त्यामुळे त्या भागातील तरुणाई व्यसनाधीन होऊन गुन्हेगारीकडे वळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अवैध धंदेवाल्यांच्या पायाशी लोळण घालणाऱ्या हवेली पोलीसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी हा धोका ओळखून वेळीच याबाबत आवाज उठविण्याची गरज आहे. अन्यथा अनेक पिढ्या बरबाद झालेल्या असतील.