
IMPACT: नांदेड, किरकटवाडी, नांदोशी-सणसनगर या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला सुरक्षा जाळी बसविण्याचे काम तातडीने सुरू: द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेसने लक्ष वेधल्यानंतर पालिकेची कारवाई
IMPACT: नांदेड, किरकटवाडी, नांदोशी-सणसनगर या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला सुरक्षा जाळी बसविण्याचे काम तातडीने सुरू: द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेसने लक्ष वेधल्यानंतर पालिकेची कारवाई
सिंहगड रोड: नांदेड, किरकटवाडी , नांदोशी व सणसनगर या चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला सुरक्षा जाळी बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचे याकडे लक्ष वेधून घेतल्यानंतर दोनच दिवसांत पालिकेने तत्परतेने कार्यवाही केली आहे.

पाणीपुरवठा विहिरीला सुरक्षा जाळी नाही, सुरक्षारक्षक नाही व सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने विहिरीची सुरक्षा रामभरोसे असल्याचे वृत्त द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केले होते. पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या भेटीदरम्यानही या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या.
लाखो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने पालिकेने तातडीने दखल घेऊन दोनच दिवसांत सुरक्षा जाळी बसविण्याचे काम सुरू केले आहे. सुरक्षा जाळी बसविल्याने भटकी कुत्री व इतर जनावरे विहिरीत पडण्याचा धोका प्रतिबंधीत झाला आहे. जाळ्या बसविल्यानंतर त्याला रेड ऑक्साईड व काळा रंग देण्यात येत असल्याने त्याबाबत काही नागरिकांनी संताप व्यक्त केला. रंगाचा डबा जाळीवर ठेवून संबंधित कर्मचारी रंग देत असल्याने व रंगांचे थेंब पाण्यात पडत असल्याने तुम्ही पाणी सुरक्षित करता की अधिक दुषित करता असे म्हणत नागरिकांनी जाब विचारला.
सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक पाहिजेच
लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने विहिरीच्या पूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असणे व कायमस्वरूपी सुरक्षारक्षक तैनात असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. जोपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले जात नाहीत व कायमस्वरूपी सुरक्षारक्षक तैनात केले जात नाहीत तोपर्यंत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस याबाबत सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.