
Khadakwasla Dam Encroachment: खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील 23 अतिक्रमणांवर होणार कारवाई! पण इतरांचे काय?
Khadakwasla Dam Encroachment: खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील 23 अतिक्रमणांवर होणार कारवाई! पण इतरांचे काय?
पुणे: खडकवासला, पानशेत व साखळीतील इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांचा प्रश्न विधानसभेत गाजल्यानंतर प्रशासनाने कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील 23 अतिक्रमण धारकांना पाटबंधारे विभागाने नोटीस बजावली असून पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे कारवाईबाबत निर्देश देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र केवळ 23 अतिक्रमणांना नोटीसा देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
केवळ खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा विचार केल्यास दोन्ही बाजूंना शेकडो फार्महाऊस, रिसॉर्ट, हॉटेल, बंगले थेट पाण्यालगत बांधण्यात आलेले आहेत. राजरोसपणे पाण्यात भराव टाकून, भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आलेले आहे. यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून जास्त अतिक्रमणांना नोटीसा देण्यात आलेल्या होत्या आता त्या ’23’ वर आल्या आहेत. याचा अर्थ काहींसाठी पाटबंधारे विभाग ‘लाडके अतिक्रमण धारक ‘ योजना राबवत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव,टेमघर या धरण साखळीतील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरले जाते. मागील काही वर्षांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिक बांधकामे करण्यात आल्याने त्यातील सांडपाणी थेट धरणांमध्ये मिसळत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असून पाटबंधारे विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. पाटबंधारे विभागाकडून केवळ नोटीसा पाठवून कागदी घोडे नाचविण्याचा उद्योग सुरू असून अतिक्रमण धारकही ‘मामाचं पत्र हरवलं’ असं म्हणून त्या नोटीसांना केराची टोपली दाखवत आहेत! आताही वेवळ 23 अतिक्रमणांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने हा दिखावा करुन इतरांना वाचविण्याचा डाव असल्याचे दिसत आहे.
पदाधिकारी-अधिकारी आघाडीवर!
खडकवासला धरण साखळीतील पाणलोट क्षेत्रात अतिक्रमण करण्यात बडे अधिकारी व पदाधिकारी आघाडीवर आहेत. त्यामुळेच तर कारवाईस टाळाटाळ केली जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाटबंधारे विभाग सर्वसामान्य शेतकरी, नागरिक यांना कायद्याचा धाक दाखवून बेजार करतो मात्र अशा बड्या धेंडांच्या अतिक्रमणांवर कारताना कशाचा धसका घेतोय? पाटबंधारे विभाग व महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण मोहिम हाती घेऊन कोणताही भेदभाव न करता सर्व अतिक्रमणांवर कारवाई करणे आवश्यक आहे.








