
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन कामगारांना PMRDA अग्निशमन दल आणि PDRF मुळे जीवदान; दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू; नांदेड सिटी लगत पुणे मनपाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी घडली दुर्घटना
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन कामगारांना PMRDA अग्निशमन दल आणि PDRF मुळे जीवदान; दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू; नांदेड सिटी लगत पुणे मनपाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी घडली दुर्घटना
पुणे: नांदेड सिटी लगत मुठा नदीपात्रात नदी सुधार प्रकल्पांतर्गत पुणे मनपाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी अचानक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार कामगारांपैकी तीन कामगारांना वाचविण्यात PMRDA अग्निशमन दल आणि PDRF जवानांना यश आले आहे. दुर्दैवाने या दुर्घटनेत एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मातीच्या ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला मिळाल्यानंतर काही मिनिटांतच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व तातडीने बचावकार्य सुरू केले. PDRF चे जवानही थोड्याच वेळात दाखल झाले.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे व विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाचे तीस जवान युद्ध पातळीवर बचावकार्य करत होते. मातीचा ढिगारा मोठा असल्याने कामकारांना सुखरुप बाहेर काढण्याचे आव्हान होते मात्र जवानांनी अत्यंत तत्परतेने काम करत तीन कामगारांना जीवदान दिले. बचावकार्य सुरू असताना श्वास गुदमरलेल्या कामगारांना कृत्रिम ऑक्सिजन पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जवान अडकलेल्या कामगारांना मानसिक धीर देत होते. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. कामगारांना निष्काळजीणे जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी काम करायला लावणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणे आवश्यक आहे.








