
कार्यकर्ता काय असतो ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दाखवून देऊ; खडकवासल्याचे माजी सरपंच सौरभ मते यांचा इशारा; आमदार भिमराव तापकीर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
कार्यकर्ता काय असतो ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दाखवून देऊ; खडकवासल्याचे माजी सरपंच सौरभ मते यांचा इशारा; आमदार भिमराव तापकीर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
पुणे: निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांचा अपमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कार्यकर्ता काय असतो ते याच निवडणुकीत दाखवून देऊ असा इशारा खडकवासला गावचे माजी सरपंच सौरभ मते यांनी दिला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने सौरभ मते यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
प्रभाग क्रमांक 33 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असताना घड्याळासाठी एकही जागा सोडण्यात आली नाही किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागणी केली नाही. आम्हाला अंधारात ठेवून चारही उमेदवार ठरविण्यात आले. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे सर्व कार्यकर्ते अत्यंत निराश झाले असून पक्षाच्या अशा आडमुठ्या भूमिकेमुळे संतप्त झाले आहेत असे मत सौरभ मते यांनी व्यक्त केले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यास योग्य सन्मान राखला जाईल व परिसरातील विकासकामे करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याने कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता सर्वांनी भारतीय जनता पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला. आजपासून आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सज्ज झालो असून येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कार्यकर्ता काय असतो ते दाखवून देऊ असा इशारा सौरभ मते यांनी दिला आहे. आमदार भिमराव तापकीर यांच्या उपस्थितीत सौरभ मते यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी प्रभाग क्रमांक 33 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उपस्थित होते.









