
धक्कादायक… माजी सैनिकाची आठवण पुसण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांची धडपड;पायगुडे कुटुंबाने आठवण म्हणून जपलेले घर पाडण्यासाठी मंडळ अधिकारी उतावीळ; सरकारने आडमुठी भुमिका घेतल्यास जशास तसे उत्तर देण्याचा पायगुडे कुटुंबाचा इशारा
धक्कादायक… माजी सैनिकाची आठवण पुसण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांची धडपड;पायगुडे कुटुंबाने आठवण म्हणून जपलेले घर पाडण्यासाठी मंडळ अधिकारी उतावीळ; सरकारने आडमुठी भुमिका घेतल्यास जशास तसे उत्तर देण्याचा पायगुडे कुटुंबाचा इशारा
पुणे: सर्वसामान्य शेतकऱ्यांनी अनेक वेळा विनंत्या करुनही त्यांच्या नोंदी जाणीवपूर्वक रद्द करणारे, महिला तलाठ्यांनी गैरवर्तनाचे गंभीर आरोप करत लेखी तक्रार केल्याने नाचक्की झालेले हवेली तालुक्यातील कोंढवेधावडे मंडळ अधिकारी भारत रुपनवर हे सध्या प्रचंड कार्यक्षम झाले असून भारत-पाक सिमेवर देशसेवा बजावलेले कुडजे येथील माजी सैनिक कै. कृष्णा भगवंत पायगुडे यांचे निवासस्थान पाडण्यासाठी नोटीसांवर नोटीसा पाठवत आहेत. धक्कादायक म्हणजे यामागे एक लोकप्रतिनिधी असून त्या लोकप्रतिनीधीच्या दबावाखाली महसूल विभाग काम करत असल्याचे ऐकायला मिळत आहे.
माजी सैनिक कै कृष्णा भगवंत पायगुडे यांनी 3 वर्षे हैदराबाद, 3 वर्षे राजस्थान, 3 वर्षे जम्मू काश्मीर, 3 वर्षे आसाम व 3 वर्षे थेट पारत पाकिस्तान सीमेवर देशाची सेवा केली आहे. 1988 साली सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांनी कुडजे येथील त्यांच्या गट नं 50/29 मध्ये घर बांधले होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर पायगुडे आपल्या कुटुंबासह तेथे राहत होते. माजी सैनिक कृष्णा पायगुडे यांच्या निधनानंतर पायगुडे कुटुंबाने आठवण म्हणून ही वास्तू जपली आहे. आजही पायगुडे यांची पत्नी व मुले येथे वास्तव्य करतात.
मागील काही काळापासून महसूल विभागाने पायगुडे यांचे घर पानंद रस्त्यात येत असल्याने ते पाडण्यासाठी नोटीसा देण्यास सुरुवात केली आहे. उतावीळ झालेले मंडळ अधिकारी दहा दिवसांपूर्वी जेसीबी, महसूल कर्मचारी, पोलीस पाटील व पोलीसांचा मोठा फौजफाटा घेऊन आले होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांना पाडकाम न करता परतावे लागले.
शासनाने दुटप्पी भूमिका घेऊ नये
दरम्यान पायगुडे यांना अतिक्रमण म्हणत नोटीसा देत असताना संबंधितांनी खातरजमा करायला हवी आहे. पायगुडे यांच्या मालकीच्या जागेतून एनडीए-बहुली रस्ता गेला असून उलट तेच अतिक्रमण आहे. त्याचा कोणताही मोबदला पायगुडे कुटुंबाला मिळालेला नाही. परंतु सौजन्यशीलता दाखवत पायगुडे कुटुंबाने कधीही आडमुठी भुमिका घेत वहिवाट बंद केली नाही किंवा विरोध केला नाही. दुसऱ्या बाजूला अधिकारी मात्र वैयक्तीक द्वेषभावना ठेवून काम करत असल्याचे दिसत आहेत.
कारवाईला विरोध नाही
संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी जरी द्वेषापोटी पायगुडे यांची आठवण पुसण्याचा प्रयत्न करत असले तरी कुटुंबीयांनी विरोध केला नाही. आमचे 11 गुंठे क्षेत्र शिल्लक ठेवून राहिलेली सर्व जागा मंडळ अधिकाऱ्यांनी ताब्यात घ्यावी त्याला आमची काही हरकत नाही असे पायगुडे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
नेमकं अतिक्रमण काय आहे हे कळायला हवं
वडीलांनी देशसेवा करुन मिळालेल्या कष्टाच्या कमाईतून तेव्हा आमच्यासाठी हा निवारा उभा केला. ही केवळ वास्तू नाही तर आमच्यासाठी आठवणींचा ठेवा आहे. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सातत्याने विनंती करत आहोत की नेमकं आमचं अतिक्रमण काय आहे? आम्हाला स्पष्टपणे दाखवून द्या. तसंच हे करताना आमच्या मालकीची 11 गुंठे जागा अबाधित ठेवा. मनमानी पद्धतीने कोणतीही कारवाई व्हायला नको. आमचं 11 गुंठे क्षेत्र असल्यास शासनाची एक इंचही जागा आम्हाला नको अशी स्पष्ट भूमिका पायगुडे कुटुंबाने घेतली आहे.
अपील प्रलंबित
संबंधित रस्त्याबाबत हवेली तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयाला पायगुडे कुटुंबियांनी हवेली उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हरकत घेतलेली आहे. त्याबाबत अद्याप सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आमची पूर्ण बाजू ऐकून घ्यावी, तथ्य पडताळणी करण्यात यावी व त्यानुसार योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी पायगुडे कुटुंबाने केली आहे.
सुडबुद्धीने कारवाई?
माजी सैनिक कै पायगुडे यांच्या घरावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचे शंका उपस्थित होत आहे. स्वतःचे अतिक्रमण पाडल्याने नाहक राग धरून असलेला एक उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी व स्वतः विरोधात तक्रार झाल्यामुळे चिडलेले मंडळ अधिकारी असे सर्व मिळून पायगुडे यांचे घर पाडून बदला घेण्यासाठी कुटील डाव खेळत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तहसीलदार हवेली यांचा जरी आदेश झालेला असला तरी त्याबाबत हवेली उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील प्रलंबित आहे. त्यामुळे तथ्य समजून न घेता व पायगुडे यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता कारवाई करण्यासाठी नोटीसा पाठविल्या जात आहेत. यामध्ये महसूल मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा दबाव असल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे नेमकं कोणाच्या स्वार्थासाठी माजी सैनिकाची आठवण पुसण्याचा संताप जनक प्रकार करण्याचा प्रयत्न केला जात आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.








