Officer Suspended:खरी चूक पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची, भरडले पालिकेचे सहाय्यक आयुक्त; पुरानंतर स्वच्छतेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्यावर पण ‘ज्यांनी पूर आणला’ ते मात्र मोकाट; पालिकेचे कर्मचारी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करणार
पुणे: ज्या पाटबंधारे विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सिंहगड रस्ता परिसरातील मुठा नदीकाठच्या परिसराला पुराचा वेढा पडून शेकडो नागरिकांना त्याचा नाहक फटका बसला त्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही मात्र पूरामुळे पसरलेला चिखल गाळ व इतर प्रकारची स्वच्छता करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे. पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान दुसऱ्याने केलेल्या चुकीचे खापर सहाय्यक आयुक्तांच्या डोक्यावर फुटल्याचे आणि सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचा राजकीय बळी गेल्याचे बोलले जात आहे.
25 जुलै रोजी खडकवासला धरणातून पहाटेपासून 35574 क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र हा विसर्ग 55 ते 60 हजार क्युसेक ने सुरु होता. अचानक धरणातून सोडण्यात आलेला एवढा मोठा विसर्ग आणि परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे दुथडी भरून वाहणारे ओढे,नाले,गटारे,रस्ते यांमुळे सिंहगड रस्ता परिसरातील मुठा काठच्या रहीवासी भागात भिषण पूरस्थिती निर्माण झाली. काही कळण्याच्या आत परिसराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आणि त्यात अनेकांच्या संसाराचा अक्षरशः चिखल झाला.
सुदैवाने पाऊस थांबला व हळूहळू पूर ओसरला मात्र पुरामुळे परिसरात चिखल,गाळ, राडारोडा,कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी मागील दोन दिवसांपासून या भागातील स्वच्छता करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यानच्या काळात या पूरग्रस्त परिसरात राजकीय नेत्यांचे दौरे सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दुसऱ्या बाजूला पूरामुळे मोठे नुकसान झालेल्या नागरिकांचा संताप अनावर होताना दिसत आहे. पूरामुळे वातावरण तापलेले असताना त्याची झळ आता सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना बसली असून कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
हा पूर पाटबंधारे विभागातील अधिकारी निर्मितच!
द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने खडकवासला धरणामागे जाऊन मुठा नदी पात्रात सुरू असलेल्या विसर्गाचे ग्राउंड रिपोर्टींग केले होते. 25 जुलै रोजी सकाळी 35,574 क्युसेक विसर्ग सुरू आहे असे जेव्हा पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले होते तेव्हा पाण्याची उंची खडकवासला धरणामागील पुलाच्या वरच्या भागाला टेकण्यास थोडी कमी होती. पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार सायंकाळी सहा वाजल्यापासून पून्हा 40 हजार क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे पितळ उघडे पडले. खडकवासला धरणामागील पुलालगतच्या भरावावर सकाळच्या 35 हजार क्युसेक च्या खुना वर आणि सायंकाळी 6 वाजता सुरू असलेल्या 40 हजार क्युसेकचे पाणी त्या खुनेपासून तब्बल सात ते आठ फूट खाली दिसत होते.
पाटबंधारे विभागातील बेजबाबदार अधिकारी मोकाट!
25 जुलै रोजीच्या ‘पाटबंधारे विभाग निर्मित’ पूरास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. खडकवासला धरणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. धरणातून त्या दिवशी अतार्कीकपणे बेफाम विसर्ग सोडण्याचे आदेश ज्या अधिकाऱ्यांनी दिले त्यांची तातडीने चौकशी व्हायला हवी. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. ‘जखम शेपटीला अन् मलम शेंडीला’ असं करुन प्रश्न सुटणार नाही.
अधिकारी, कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, सर्व अधिकारी व कर्मचारी पूर आल्यापासून ते आतापर्यंत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले याचा निषेध म्हणून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी काळ्या फिती बांधून काम करणार असल्याची माहिती मिळत आहे. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्यात येत असेल तर अशा कारवाईचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून कर्मचारी काम करणार असल्याची माहिती ऐकायला मिळत आहे.