The Investigation Express IMPACT: अखेर एका पाणवठ्यात वन विभागाने सोडले पाणी; दुसऱ्या पाणवठ्याची दुरावस्था
पुणे: सिंहगडाच्या पश्चिमेकडील ऐतिहासिक काळुबाई मंदिराजवळील पाणवठ्यात अखेर वन विभागाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर वन विभागाने तातडीने कार्यवाही केली असून ट्रॅक्टर टॅंकरने पाणवठ्यात पाणी सोडण्यात येत आहे. पाणवठ्यात पाणी सोडल्याने उन्हाचा कडाका वाढत असल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबणार आहे.
मागील वर्षी लाखो रुपये खर्चून वन विभागाने सिंहगडाच्या पश्चिमेकडील ऐतिहासिक काळुबाई मंदिराजवळ सिमेंट कॉंक्रीटचा पाणवठा तयार केलेला आहे. परिसरातील जंगली प्राणी या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत असल्याचे दिसून आले होते. यावेळी मात्र वन विभागाने या पाणवठ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. पाणवठ्यात कचरा व माती पडलेली दिसत होती. तसेच पाणी नसल्याने उन्हामुळे पाणवठ्याला तडे गेल्याचेही दिसत आहे.
याबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने दि 3 मार्च रोजी वन विभागाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तातडीने कार्यवाही करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून पाणवठा साफ करून घेतला व आज पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापुढे नियमित पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती भांबूर्डा वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी दिली आहे.
दुसऱ्या पाणवठ्याचे काम अत्यंत निकृष्ट
काळुबाई मंदिराजवळील पाणवठ्याला काही प्रमाणात तडे गेले असले तरी किरकोळ दुरुस्तीने पाणवठ्याची गळती थांबू शकते; परंतु येथून काही अंतरावर तयार करण्यात आलेल्या दुसऱ्या पाणवठ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने तो पाणवठा पूर्ण उखडला आहे. हातानेही सिमेंट कॉंक्रीटचा भूगा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे केवळ बिल काढण्यासाठी हा पाणवठा दाखविण्यात आला होता का? असा प्रश्न उपस्थित होत असून संबंधित ठेकेदार व तत्कालीन जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.