
हवेली महसूल पथकाची नांदोशी-धायरी परिसरात धडक कारवाई; अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरवर ठोकला साडेपाच लाख रुपये दंड;डंपर नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये जमा
हवेली महसूल पथकाची नांदोशी-धायरी परिसरात धडक कारवाई; अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरवर ठोकला साडेपाच लाख रुपये दंड;डंपर नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये जमा
पुणे: अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीविरोधात हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या पथकाने काल रात्री धायरी व नांदोशी परिसरात धडक कारवाई करत एका डंपरवर तब्बल साडेपाच लाख रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच संबंधित डंपर नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
आवश्यक परवानग्या न घेता गौण खनिज उत्खनन व वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांनी धायरी व नांदोशी परिसरात कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार महसूल नायब तहसीलदार सचिन आखाडे, मंडळाधिकारी किशोर पाटील, गौतम ढेरे, राठोड, ग्राम महसूल अधिकारी भिम शिंदे व विनोद कानवटे यांच्या पथकाने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई करत MH12 VT 5191 या डंपरवर तब्बल साडेपाच लाख रुपये दंड ठोकला आहे.
नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी स्वतः रात्री अकरा वाजता अचानक धाड टाकल्याने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणारांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित डंपर नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. नियमभंग करुन किंवा विहित परवानग्या न घेता गौण खनिज उत्खनन व वाहतूक आढळून आल्यास यापुढे संबंधितांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.








