
साहेब…… खाल्लेल्या भाताला तरी जागायचं ओ! मंडळाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सर्वसामान्य शेतकरी हतबल; जिल्हाधिकारीऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज
साहेब…… खाल्लेल्या भाताला तरी जागायचं ओ! मंडळाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सर्वसामान्य शेतकरी हतबल; जिल्हाधिकारीऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज
कोंढवेधावडे: कुडजे (ता. हवेली) येथील शेतकऱ्याला स्वतःच्या चुलत्याने जमिन नावे करुन दिली. संबंधित शेतकऱ्याने सातबारावर नोंद करण्यासाठी प्रकरण दाखल केले. तलाठ्यांनी नोंदीचा फेरफार नंबर पुढे मंडलाधिकारी यांच्याकडे पाठविला. शेतकऱ्याने मंडलाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारायला सुरुवात केली. ‘साहेबांनी’ अपेक्षा व्यक्त केली परंतु सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने इतके पैसे नोंदीसाठी देऊ शकत नसल्याचे सांगितले. साहेबांना इंद्रायणी तांदळाचा भात आवडतो म्हणून शेतकऱ्याने एक गोणी इंद्रायणी तांदूळ साहेबांना दिले. परंतु साहेब मात्र खाल्लेल्या भाताला जागले नाहीत! भाताच्या ताटाला अपेक्षित वटकावणं न लावल्याने साहेब रुसले आणि नोंद रद्द केली.
संबंधित शेतकऱ्यांने घडरेला प्रसंग द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस ला सांगितल्यानंतर साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन अशी आडवणूक करु नका. कसलीही अपेक्षा न ठेवता या शेतकऱ्याचे काम करुन टाका असे स्पष्टपणे सांगितले. साहेब कसंतरी तयार झाले परंतु पुन्हा महिनाभर पाठपुरावा करुनही दुसऱ्या वेळेस पाठविलेली नोंद साहेबांनी रद्द केली. कसला मनमानी कारभार सुरू आहे हा? शेतकऱ्यांची किती अडवणूक सुरू आहे. पैसे नसतील तर शेतकऱ्यांचे कामच होणार नाही का?
साहेबांनी अगोदर मागणी केल्याप्रमाणे पन्नास हजार दिले असते तर कसलीही अडचण न येता नोंद मंजूर झाली असती. परंतु पैसे न दिल्याने जाणीवपूर्वक काहीतरी कारणं काढून आणि नियमांवर बोट ठेवून नोंद रद्द केली जात आहे. हा मनमानी कारभार थांबायला हवा. सर्वसामान्य शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबायला हवी. हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, प्रांत अधिकारी यशवंत माने व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.








