‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’चा दणका: अखेर त्या अधिकाऱ्याने बदलला गाडीचा नंबर; लोकांना कायदा शिकवणाऱ्याला कायद्याने शिकवला धडा; ‘9’ चा केला होता ‘5’
पुणे: वाहतूकीचे नियम मोडल्यानंतर ऑनलाईन पडणाऱ्या दंडाच्या पावत्यांपासून वाचण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. कोणी अत्यंत बारीक अक्षरांत नंबर टाकून घेतो,कोण अक्षरं लहानमोठे करतो, कोण चमकत्या रेडीअमचा वापर करुन नंबर टाकतो वगैरे वगैरे. अर्थात असं केल्याने वाहतूक नियमांचा भंग होतो आणि जर वाहतूक पोलिसांनी अशा फॅन्सी नंबर प्लेट असलेले वाहन पकडले तर दंडात्मक कारवाई केली जाते. हे झालं सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत.
पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कायदा माहित असताना जाणीवपूर्वक स्वतः वापरत असलेल्या वाहनाचा नंबर चूकीच्या पद्धतीने टाकून घेतला होता. गाडीच्या नंबरचा शेवटचा आकडा ‘9’ असताना तो ‘5’ दिसेल असा टाकण्यात आला होता. त्यामुळे जरी वाहतुकीचे नियम मोडले तरी ऑनलाईन पावती पडण्याचा विषयच नव्हता आणि जर वाहतूक पोलिसांनी गाडी पकडली तरी ‘पोलीस अधिकारी’ म्हटल्यावर कोण कारवाई करणार? त्यामुळे स्वतः जबाबदार पदावर असलेल्या व कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यानेच अशाप्रकारे कायद्याची ‘मोडतोड’ केली होती.
सिंहगड रस्त्यावरील हवेली पोलीस ठाण्याच्या समोर ही गाडी उभी असायची मात्र सिंहगड रोड वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कधीही यावर कारवाई केली नव्हती. ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने याबाबत सिंहगड रोड वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी राजकुमार बर्डे यांच्याशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार एकदा एक वाहतूक पोलीस कर्मचारी त्यांनी कारवाईसाठी तेथे पाठवला परंतु त्या कर्मचाऱ्यालाही ‘नियम मोडणाऱ्या वर्दीचा कळवळा आला’ आणि त्याने कारवाई करण्याऐवजी गाडी काढून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पटकन गाडी काढून ‘आडबाजूला’ लावण्यात आली. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर एक दिवस संबंधित गाडीवर दंडात्मक कारवाई केल्याचे वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी राजकुमार बर्डे यांनी सांगितले. परंतु तरिही त्या अधिकाऱ्याने नंबरप्लेट बदलून घेतली नव्हती. ‘हम करे सो कायदा’ अशा आविर्भावात असलेल्या त्या अधिकाऱ्याला अखेर उशिरा का होईना उपरती झाली आणि आता आरटीओ नियमाप्रमाणे सुटसुटीत नंबरप्लेट तयार करून घेण्यात आली आहे. अखेर कायद्याने धडा शिकवला!