अखेर वन विभागाच्या तपासणी नाक्यावरील कर्मचारी ॲक्टीव; वाहनांच्या तपासणी दरम्यान मद्याच्या बाटल्या जप्त; उपद्रवी पर्यटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
सिंहगड: सिंहगडाच्या पायथ्याशी गोळेवाडी व घाट रस्त्यावरील कोंढणपूर फाटा येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावरील वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी अखेर ‘ॲक्टीव’ झाले असून मागील काही दिवसांपासून त्यांच्याकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. वाहनांची तपासणी करत असताना मद्याच्या बाटल्या आढळून येत असून त्या नष्ट करण्यात येत आहेत. मात्र केवळ मद्य नष्ट न करता अशा उपद्रवी पर्यटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दुर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.
वन विभागाचे तपासणी नाके हे केवळ ‘उपद्रव शुल्क संकलन केंद्रे आहेत का?’ असा सवाल ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने उपस्थित केला होता. कारण आलेल्या वाहनांची कोणतीही तपासणी न करता केवळ उपद्रव शुल्क घेऊन सोडण्यात येत होते. त्यामुळे वाहनांतून मद्य घेऊन जाणाऱ्या समाजकंटकांवर कोणताही वचक राहिला नव्हता.
मागील काही दिवसांपासून मात्र तपासणी नाक्यावरील कर्मचारी ॲक्शन मोडवर आलेले दिसत आहेत. वाहनांची तपासणी करण्यात येत आहे आणि मद्याच्या बाटल्या जप्त करुन नष्ट करण्यात येत आहेत. मर्यादित अधिकार असल्याने कारवाई करताना अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य जोपासण्यासाठी आणि अशा उपद्रवी पर्यटकांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक नियम बनवून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
पोलीस कर्मचारी तैनात असणे गरजेचे
सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक सिंहगडावर येत असतात. काही वेळा पर्यटकांमध्ये वाद झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. तसेच अनेक वाहनचालक तपासणी नाक्यावर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. अशावेळी तपासणी नाक्यावर किमान सुट्टीच्या दिवशी तरी पुर्णवेळ पोलीस कर्मचारी तैनात असणे गरजेचे आहे. कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस कर्मचारी उपस्थित असल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांनी विचार करणे आवश्यक आहे.