
हवेली पोलीसांची ऐतिहासिक कामगिरी! 500 रुपयांची गावठी दारू आणि 175 रुपयांची ताडी जप्त
खडकवासला: पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्य साई कार्तिक यांनी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी करत मोठा मद्यसाठा पकडल्यानंतर अब्रुची लक्तरं निघलेल्या हवेली पोलीसांना उपरती झाली असून आता ‘दाखविण्यासाठी’ कारवाया सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खडकवासला येथे तब्बल 500 रुपयांची गावठी दारू आणि 175 रुपयांची ताडी असा असा मुद्देमाल जप्त करुन दोन विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या दोन्ही कारवायांमध्ये विशेष म्हणजे या दोन्ही अवैध धंद्यांची माहिती गोपनीय बातमी दारा मार्फत एकाच व्यक्तीला म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र विनायक चौधरी(3033) यांना मिळाली होती! त्यानुसार त्यांनी व पोलीस हवालदार अजय पाटसकर व इतर काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने “अत्यंत शिताफीने सापळा रचून छापा टाकला” आणि ही ऐतिहासिक कामगिरी करत पाच लिटर पीवळसर रंगाची आंबट उग्र वास असणारी गावठी दारू आणि पाचच लिटर उग्र वास असणारी ताडी असा तब्बल 675 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला!!
दरम्यान पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्य साई कार्तिक यांची हवेली पोलीसांनी मोठी धास्ती घेतल्याची माहिती ऐकायला मिळत आहे. त्यामुळे खास असलेल्या धंदेवाल्यांना निरोप गेले असून काही दिवस ‘आपले धंदे’ बंद ठेवा असा सल्ला स्वतः “त्यांनी” दिल्याची माहिती मिळत आहे. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्य साई कार्तिक यांनी झोप उडविल्यानंतर हवेली पोलीस खडबडून जागे झाल्याचे दिसत आहेत. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत या गोष्टीवर मात्र आता स्वतः हवेली पोलीसांनी शिक्कामोर्तब केले आहे!