CWPRS News:हाऊसकिपींग ठेकेदाराकडून कामगारांची लूट? पूर्ण पगार जमा करुन पुन्हा रोख स्वरूपात पैसे घेतले जातात परत; हातावरचे पोट असणाऱ्या कामगारांना कामावरुन काढून टाकण्याची धमकी
पुणे: भारत सरकारची ऐतिहासिक संस्था असलेल्या खडकवासला येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेतील(CWPRS) गैरप्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. काही वर्षांपूर्वी सुरक्षा रक्षकांच्या पगारात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर आता पुन्हा हाऊसकिपींग ठेकेदाराकडून कामगारांची लूट सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने कामगारांचा मागील सुमारे चार महिन्यांपासून पगार थकविल्याने कामगार संताप व्यक्त करत आहेत.
CWPRS मधील हाऊसकिपींगचे कंत्राट एका खासगी कंपनीला मिळालेले आहे. एकूण अंदाजे 46 पेक्षा जास्त कामगारांचे हे कंत्राट असून त्यांना कागदावर सुमारे सातशे रुपयांपेक्षा जास्त हजेरी आहे. धक्कादायक म्हणजे करारातील नियमाप्रमाणे कामगारांच्या खात्यावर पगार जमा केला जातो परंतु त्यांच्याकडून त्यातील काही रक्कम रोख स्वरूपात पुन्हा परत घेतली जात असल्याचे कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच याबाबत कुठे वाच्यता केली तर कामावरून काढून टाकण्याची भिती कामगारांना दाखविली जात असल्याचेही कामगारांनी सांगितले.
या प्रकरणी अजून एक धक्कादायक माहिती समोर येत असून कामावर घेण्यासाठी सुरुवातीलाच प्रत्येक कामगाराकडून दहा हजार रुपये घेण्यात आल्याचेही कामगार सांगत आहेत. याबाबत सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे सुरक्षा रक्षक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती त्याप्रमाणे हाऊसकिपींग कामगार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमणे आवश्यक आहे. तसेच वारंवार होणारे असे गैरप्रकार रोखण्यासाठी CWPRS प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक बनले आहे.