NDA Road accident: एनडीए-बहुली रोडवरील तो अपघात की घातपात? उत्तमनगर पोलीसांकडून तपास सुरू; उपचारांदरम्यान एका तरुणाचा मृत्यू
पुणे: एनडीए-बहुली रस्त्यावर काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ऑलिव्ह रेसिडेन्सी सोसायटी समोर भरधाव कारने रस्त्याच्या कडेने पायी चालत असलेल्या दोन तरुणांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान यातील एका तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अजिंक्य केदार पाटील (वय 17 रा. स्वरुप दर्शन सोसायटी, मारुती मंदिराजवळ,कोंढवे धावडे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. धडक दिल्यानंतर संबंधित अज्ञात कारचालक फरार झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यातून हा अपघात नाही तर घातपात होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत नवनाथ मारुती तावरे (वय 47, रा. तावरे कॉम्प्लेक्स, युनिटी मेडीकल जवळ, कोंढवे धावडे) यांनी अज्ञात कारचालकाच्या विरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मनिष नवनाथ तावरे (वय 17) आणि अजिंक्य केदार पाटील (वय 17) हे दोघेजण मित्र रस्त्याच्या कडेने चालत होते. रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास एनडीए-बहुली रस्त्यावरील ऑलिव्ह रेसिडेन्सी सोसायटीच्या समोर मागून भरधाव आलेल्या कारने दोन्ही तरुणांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जास्त होती की दोन्ही तरुण पंधरा ते वीस फूट लांब फेकले गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे.
दोन्हीही तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडले होते. याबाबत माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युसुफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. ए. जोशी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. दोन्हीही जखमी तरुणांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने यातील अजिंक्य केदार पाटील या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत नवनाथ तावरे यांनी अज्ञात कारचालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार पुढील तपास करत आहेत.
का वाटतेय घातपाताची शक्यता?
दोन्ही तरुण चालत असताना इतर वाहने ये-जा करताना दिसत आहेत. तरुण रस्त्याच्या अगदी कडेने चालत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ज्या कारने धडक दिली त्या कराने तरुणांच्या जवळ आल्यानंतर तरुणांच्या बाजूने थोडेसे वळण घेतल्याचे व धडक देऊन पुन्हा सरळ दिशा करुन निघून गेल्याचे दिसत आहे. अपघातानंतर कारचालक थांबला नाही. कारचा टायर फुटल्याचे किंवा इतर तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हा घातपात असण्याची शक्यता सीसीटीव्ही फुटेज मधून दिसून येत आहे. याबाबत पोलीस तपास सुरू असून तपासातून हा अपघात होता की घातपात हे स्पष्ट होणार आहे.
कार आणि चालक ताब्यात
याबाबत सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे तपास करुन लाल रंगाची मारुती ब्रेझा (एम एच 12 व्ही व्ही 4163) ही कार व पेशाने सायबर एक्सपर्ट असलेला आरोपी अजिंक्य अरुण आघाडे (वय 36, रा. स्नेहा विहार, दांगट पाटील नगर, शिवणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त भिमराव टेळे, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युसुफ शेख, गुन्हे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जोशी, पोलीस हवालदार विनोद शिंदे, कोळेकर, पोलीस नाईक हजारे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पाडाळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.