Burglary incident:किरकटवाडीत घरफोडी; सुमारे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास; पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय
पुणे: किरकटवाडी येथील नांदोशी रस्त्यावर असलेल्या उत्सव सोसायटीत घरफोडी झाल्याची घटना घडली असून अज्ञात चोराने सुमारे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. चोरी करणारा सोसायटीतील कोणीतरी असावा व त्याने पाळत ठेवून सफाईदारपणे ही चोरी केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही काही संशयास्पद हालचाली कैद झाल्या असून हवेली पोलीस त्याआधारे चोराचा शोध घेत आहेत.
उत्सव सोसायटीत सी विंगच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या 404 क्रमांकाच्या सदनिकेत ही चोरीची घटना घडली आहे. घर बंद केल्यानंतर चप्पल स्टॅंडच्या आतमध्ये एका बुटात चावी ठेवण्यात आली होती. चोराने पाळत ठेवून चावी घेऊन घर उघडून चोरी केली व पुन्हा चावी बुटात ठेवली,मात्र चोराने चावी ठेवताना दुसऱ्या बुटात ठेवली. घरातील व्यक्ती आल्यानंतर त्यांना चावी दुसऱ्या बुटात आढळली. त्यांनी घाईघाईने दरवाजा उघडला व घरात जाऊन पाहिले असता कपाट उघडे होते व दागिने ठेवलेले पाकीट रिकामे बेडवर पडलेले होते.
याबाबत तातडीने हवेली पोलीस ठाण्याला कळविण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सोसायटीच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली असून बाहेरून कोणीही संशयित सोसायटीत आल्याचे आढळले नाही. सोसायटीतीलच एकाच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आल्या असून त्याआधारे पोलीस चौकशी करण्यात येत आहे. तसेच ज्या सदनिकेत चोरी झाली आहे त्या समोरच्या सदनिकेत राहणाऱ्या महिलेने संबंधित संशयिताला दरवाजा बंद करताना पाहिले असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सर्व अंगांनी तपास करत असून लवकरच चोराचे नाव समोर येण्याची शक्यता आहे.