सिंहगडाच्या पश्चिमेकडील मनेरवाडी गावच्या हद्दीत शाळकरी विद्यार्थ्याचा खून झाल्याने खळबळ
पुणे: सिंहगडाच्या पश्चिमेकडील मनेरवाडी गावच्या हद्दीत डोंगरमाथ्यावर असलेल्या आनंदवन सोसायटीच्या परिसरात शाळकरी विद्यार्थ्याचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खून झालेला मुलगा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात माध्यमिकच्या वर्गात शिकत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर- मनेरवाडी येथील आनंदवन सोसायटीच्या परिसरात शाळकरी मुलाचा खून झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. काही दिवसांपूर्वी गोऱ्हे बुद्रुक येथे भर रस्त्यावर कोयता गॅंगने हैदोस घातल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा शाळकरी विद्यार्थ्याचा खून झाल्याने हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तपासासाठी काही मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुलाचा खून कोणी व का केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.