खानापूर येथे मोठ्या प्रमाणात सागवानाची बेकायदा तोड; वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष
पुणे: खानापूर( ता. हवेली) येथे मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडाची तोड झाल्याचे आढळून आले असून कारवाई टाळण्यासाठी किंवा कमीत कमी कारवाई दाखविण्यासाठी वन विभागाचे अधिकारीच ‘प्रयत्नशील’ असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याची प्रचिती सिंहगड, पानशेत भागात येत आहे. परिणामी बेकायदा जंगलतोड व सागवानाच्या वखारी जोमात सुरू आहेत.
खानापूर येथे सागवानाची मोठ्या प्रमाणात तोड झालेली असल्याची माहिती काहींनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी संबंधित ठिकाणी दाखल झाले असता सागवानाची मोठमोठी लाकडे आढळून आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याऐवजी ‘संगनमताने’ ‘तोडगा’ काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वन विभागाचे अत्यंत कडक असलेले कायदे अचानक ‘सैल’ व्हायला लागले.
कारवाई करताना जवळचा-लांबचा, गावचा-बाहेरचा असा कोणताही भेद करणे चुकीचे असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तथ्याच्या आधारे योग्य कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना येथे मात्र उलट चित्र पाहायला मिळाले. शेवटी मनावर दगड ठेवून लाकडं जप्त केली असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची ही कृती सागवनाची तोड, वाहतूक व खरेदी विक्री करणारे यांच्या सोईची असल्याने सर्वकाही सुरळीत चालू असल्याचे दिसत आहे.