♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्थानिक गुन्हे शाखेची ‘ती’ कारवाई…. मिडियाबाजी, दिखाऊपणा आणि वास्तव!

पुणे: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील शेतात अफूची शेती करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती थेट स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरिक्षकांना मिळाली म्हणे! अर्थातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरिक्षकांचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे हे यावरून दिसून येतंय कारण शेतातील वाफ्यात तेही कांद्यात लावलेल्या अफूच्या झाडांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचलीय. या माहितीच्या आधारे डझनभर अधिकाऱ्यांचा फौजफाटा काल थेट शेतात गेला, एरव्ही अवकाळी पाऊस, वादळ अशावेळी पंचनामा करण्यासाठी शेतात जायला वेळ नसणारे तलाठीच काय तर अफूचा पंचनामा करण्यासाठी स्वतः सर्कल महोदय उपस्थित होते. अफू ओळखणारा निष्णात अफूतज्ञही सोबतीला होता. कारवाई झाली, दोन शेतकऱ्यांना अटकही करण्यात आली. त्यांच्यावर एनडीपीएस (अमली पदार्थ विरोधी) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण याद्वारे शेतकऱ्याचे समर्थन करत नाहीत पण पोलिसांचा हेतू संशयास्पद असल्याने वास्तव समोर येणे आवश्यक आहे.

कारवाईदरम्यान शेतात अधिकाऱ्यांनी ‘फोटोशूट’ केले! आकर्षक व्हिडिओ काढण्यात आले. जवळच्या माध्यम प्रतिनिधींकडे हे फोटो, व्हिडिओ पाठविण्यात आले आणि पाठ थोपटून घेण्यासाठी मस्त बातमी करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्याच्या शेतात अफूची झाडे आढळल्याची बातमी आज माध्यमांतून झळकत आहे. पोलीस आपल्या या ‘ऐतिहासिक’ कारवाईचा आनंद घेत आहेत. अर्थात या शेतकऱ्याचे आफू विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट होते का? आफूची विक्री कोणत्या मार्केटमध्ये होत होती? त्यातून शेतकऱ्याला किती कोटींचे उत्पन्न मिळत होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपास अधिकाऱ्यांनी आणि कारवाई करणाऱ्या पथकाच्या प्रमुखांनी शोधून काढावीत. समाजहितासाठी ते खुप गरजेचे आहे.

आता मुख्य मुद्दा पाहूयात. ‘कानून के हात लंबे होते है’ असं म्हणतात. त्यातल्या त्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तर खुपच लांब असतात असे ऐकायला मिळते. त्याची प्रचिती काल हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अफूच्या कारवाईवरुन आलेलीच आहे. मग जर शेतातील अफूच्या झाडांची ‘गोपनीय’ माहिती मिळते तर हवेली ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे विकला जाणारा गांजा, गावठी दारू, ताडी, गुटखा यांची माहिती स्थानिक गुन्हे शाखेपर्यंत कशी पोचत नाही याचे आश्चर्य वाटते. अफूची विनापरवाना शेती केली म्हणून शेतकऱ्यांना अटक झाली मग गांजा,गावठी दारू, ताडी,गुटखा यांची विक्री करण्यासाठी पोलीसांची परवाणगी आहे काय? हेही जाहिर करायला हवे. पोलीसांची दुटप्पी भूमिका संशयास्पद असून संभ्रम निर्माण करणारी आहे. एका बाजूला दिखाऊपणा करुन पाठ थोपटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला ‘अवैध धंदे सुरू नाहीत’ अशी खोटी माहिती वरिष्ठांना द्यायची ही ‘धनलक्षी भूमिका’ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिक सुजाण आहेत, सर्वकाही दिसत आहे त्यामुळे ‘डोळे मिटून दूध पिण्याची ‘ कृती उघडी पडत आहे.

 

अवैध धंदेवाल्यांपुढे पायघड्या!

हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदेवाल्यांपुढे पोलीस पायघड्या घालताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून 23 जानेवारी रोजी बातमी केल्यानंतर मला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. बर तिथपर्यंत ठिक होते पण हवेली पोलीस ठाण्याच्या पोलिस निरिक्षकांनी अवैध धंदेवाल्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन खोटी तक्रार द्यायला लावली. आपण त्याची रितसर तक्रार केलेली असून ‘चौकशी सुरू’ आहे. यातून पोलीस आपले हितसंबंध जोपासण्यासाठी कोणत्या थराला जात आहेत हे दिसून येत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून मी सातत्याने हा त्रास सहन करत आहे. जीवाला धोका असल्याने पोलिस संरक्षण देण्याची मागणीही केलेली आहे. जून 2021 मध्ये हवेली पोलीस ठाण्यातून याबाबत सकारात्मक अहवालही देण्यात आलेला आहे मात्र अद्याप संरक्षण मिळालेले नाही. आपण आपले निर्भिड लेखन मात्र थांबवणार नाही. सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल तर त्याबाबत यापूढेही परखडपणे भूमिका घेतली जाणार आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles