तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची दुचाकी आढळली पानशेत-वेल्हे रस्त्यावरील कादवे खिंडीजवळ; परिसरात शोधमोहीम सुरू
पुणे: तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची दुचाकी पानशेत-वेल्हे रस्त्यावरील कादवे खिंडीजवळ आढळून आली आहे. तन्मय किरण तांबडे( वय 24 रा. बी -201, फेज 2, सुशिला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला) असे बेपत्ता असलेल्या तरुणाचे नाव असून दुचाकी आढळून आलेल्या परिसरात त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दि. 9 मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तन्मय कामावर जातो असे सांगून घरातून त्याच्या दुचाकीवरुन गेला होता. रात्री घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही. शोधाशोध करुनही तो न सापडल्याने नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास प्रधान याबाबत तपास करत असून आज त्यांनी परिसरातील सर्व व्हॉट्स ॲप गृपवर सदर तरुणाबाबत काही माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले होते. आज सायंकाळच्या सुमारास तन्मयची दुचाकी पानशेत-वेल्हे रस्त्यावरील कादवे खिंडीजवळ सुस्थितीत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. दुचाकी आढळून आलेल्या परिसरात आपत्ती व्यवस्थापन समुहाच्या सदस्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे.