Koyat Gang CCTV footage:सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने दहा ते पंधरा गुंडांकडून तिघांवर हल्ला; भर रस्त्यावर घडलेल्या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण; घटना सीसीटीव्हीत कैद
पुणे: सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे दहा ते पंधरा गुंडांनी भर रस्त्यावर तिघांवर कोयते व तलवारींनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिनही तरुणांना किरकटवाडी फाट्याजवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून हल्ला नेमका का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोऱ्हे बुद्रुक येथील बस स्टॉपजवळ दहा ते पंधरा गुंड हातात तलवारी व कोयते घेऊन थांबले होते. दुचाकीवरुन आलेल्या गोऱ्हे बुद्रुक येथील तीन तरुणांवर त्यांनी अचानक हल्ला केला. तिनही तरुण तेथून पळाल्याने थोडक्यात बचावले आहेत मात्र मागून हत्याराचे घाव बसल्याने खोल जखमा झाल्या आहेत. हल्लेखोरांनी दुचाकीवरही दगड टाकून मोडतोड केली आहे.
तोंडाला रुमाल बांधून आलेले हल्लेखोर पसार झाले असून अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. भर रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.