Chain Snatcher arrested: अट्टल मंगळसूत्र चोर सिंहगड रोड पोलीसांच्या जाळ्यात; आठ गुन्ह्यांची कबुली
पुणे: शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून मारहाण करणाऱ्या अट्टल चोरट्याला सिंहगड रोड पोलीसांनी अटक केली असून त्याने सिंहगड रोड(3), भारती विद्यापीठ (1), अलंकार(1), चतुःश्रृंगी(1) आणि रावेत(2) अशा तब्बल आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सुमित गोविंद इंगळे (वय 28, रा. फ्लॅट नं 109, त्रिपाठी अपार्टमेंट, मारुंजी, हिंजवडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर येथे दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याची घटना घडली होती. वारंवार अशा घटना घडत असल्याने पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे कसून शोध सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वरुन आरोपीची ओळख पटविण्यात पोलीसांना यश आले होते. दरम्यान संबंधित वर्णणाचा संशयित तरुण नंबर नसलेल्या दुचाकीवर प्रयेजा सिटी समोर रस्त्याच्या कडेला थांबलेला असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून या चोरट्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याने इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, तानाजी तारु, राजू वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, अविनाश कोंडे, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर , सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहिते, अक्षय जाधव व शिरिष गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.