गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह तिघांना सिंहगड रोड पोलिसांकडून अटक
पुणे: सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धायरी येथील रायकरमळा परिसरातून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. नामदेव रामभाऊ ढेबे (वय 22), आकाश मच्छिंद्र कदम (वय २३) आणि जय संगमेश्वर दयाडे (वय 19, तिघेही रा. धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
धायरी येथील रायकरमळा परिसरातील एका शेतातील झाडाखाली तीन संशयित तरुण बसलेले असून त्यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे व सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, प्रकाश पाटील,राजू वेगरे, स्वप्नील मगर, विनायक मोहिते, मोहन मिसाळ ,विजय विरणक, योगेश उदमले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तिघांनी हे पिस्तूल व काडतुसे कोठून आणले, कशासाठी आणले याबाबत सिंहगड रोड पोलिस अधिक तपास करत आहेत.