पुणे ग्रामीण पोलिसांची गावठी दारू भट्ट्यांवर धडक कारवाई; उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोरतापवाडी, कोरेगाव मूळ येथे छापे; तब्बल दहा हजार लिटर गावठी दारू जप्त
- पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक बदलल्यापासून अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले असून पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार धडक कारवाया सुरू आहेत. उरुळी कांचन पोलीसांच्या पथकाने काल सोरतापवाडी व कोरेगाव मूळ येथे मोठी कारवाई केली असून सुमारे दहा हजार लिटर गावठी दारुसह एकूण 8 लाख 87 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोरतापवाडी,शिंदवणे गावच्या हद्दीत गावठी दारूची मोठी भट्टी सुरू असल्याची माहिती उरुळी कांचन पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून 525 लिटर तयार गावठी दारू व 5000 हजार लिटर कच्चे रसायन असा 2,42,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन भट्टी उध्वस्त करण्यात आली. भट्टीचालक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ती फरार झाली आहे. तसेच कोरेगाव मूळ येथील नर्सरी मध्ये मोठा गावठी दारुचा साठा ठेवण्यात आलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथेही उरुळी कांचन पोलीसांच्या पथकाने छापा टाकून तब्बल 9015 लिटर तयार गावठी दारू व 350 लिटर कच्चे रसायन असा एकूण 6,45,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी राजेंद्र चौधरी व जमिन मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव व उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद नवले, पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड, रणजित निकम, सचिन जगताप, मनिषा कुतवळ व पोलीस नाईक प्रमोद गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे याबाबत अधिक तपास करत आहेत.