खुनातील आरोपींवर कठोर कारवाई साठी सिंहगड रोड पोलिस स्टेशनसमोर नातेवाईकांचा ठिय्या; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासन
पुणे: सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे काल रात्री घडलेल्या खुनातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा संतप्त पवित्रा घेत मृताच्या नातेवाईकांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. मृत तरुणाची आई, बहीणी व इतर चाळीस ते पन्नास नातेवाईक पोलीस स्टेशनसमोर येऊन बसले होते. यावेळी पोलीस निरीक्षक व उपायुक्तांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी रवाना झाले आहेत.
काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आदित्य पोकळे या तरुणाची धायरी येथील पाटलाची माची परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ निर्घृण हत्या करण्यात आली होती. जमीनीच्या वादातून जवळच्या नातेवाईकाकडूनच ही हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून संपत काळोखे(रा. नांदोशी) व सागर रायकर (रा. धायरी) अशी आरोपींची नावे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींची नावे निष्पन्न झाले असले तरी अद्याप आरोपी मिळालेले नसल्याने मृत तरुणाचे नातेवाईक आक्रमक झाले होते. आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. आरोपींच्या शोधासाठी पन्नास पोलीसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली असून लवकरच आरोपी पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.