
श्रीमंत बहिणी तुपाशी, खऱ्या गरजू मात्र उपाशी! खडकवासला, एनडीए गेट परिसरातील एकाही आदिवासी कातकरी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही आधार कार्ड, मोबाईल लिंकिंग आणि बँक खात्यांच्या अडचणींमुळे शेकडो महिला योजनेपासून वंचित; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
श्रीमंत बहिणी तुपाशी, खऱ्या गरजू मात्र उपाशी! खडकवासला, एनडीए गेट परिसरातील एकाही आदिवासी कातकरी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही
आधार कार्ड, मोबाईल लिंकिंग आणि बँक खात्यांच्या अडचणींमुळे शेकडो महिला योजनेपासून वंचित; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
(निलेश बोरुडे: संपादक- द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)
खडकवासला : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचत आहे का, असा गंभीर प्रश्न खडकवासला आणि एनडीए गेट परिसरातील आदिवासी कातकरी महिलांची परिस्थिती पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे. परिसरातील एकाही आदिवासी कातकरी महिलेला या योजनेचा लाभ मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे शासकीय नोकरदार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांतील महिलांना योजनेचा लाभ मिळत असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे अत्यंत गरजू असलेल्या कातकरी महिला मात्र शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘श्रीमंत बहिणी तुपाशी, खऱ्या गरजू मात्र उपाशी!’ अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
खडकवासला, एनडीए गेटसह हवेली तालुक्यातील विविध भागांत आदिवासी कातकरी समाजाच्या वस्त्या आहेत. या वस्त्यांमधील महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या अडचणी सुटलेल्या नाहीत. अनेक महिलांकडे आधार कार्ड उपलब्ध नाही. काही महिलांचे आधार एनरोलमेंट झालेले असले तरी त्याला जोडलेला मोबाईल क्रमांक उपलब्ध नसल्याने किंवा आधार नोंदणीची पावती हरवल्याने पुढील प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्यातच अनेक महिलांकडे स्वतःचे बँक खाते नसल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
विशेष म्हणजे, या महिला आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असून त्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची सर्वाधिक गरज आहे. मात्र, मूलभूत कागदपत्रे आणि बँक खात्यांच्या अडचणी सोडवून देण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे शेकडो पात्र महिला योजनेच्या लाभापासून दूर राहिल्या आहेत.
दुसरीकडे, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिला योजनेचा लाभ घेत असल्याचा आरोप होत आहे. एवढेच नव्हे तर काही पुरुषांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतल्याचेही समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणांची शासनाने स्वतंत्रपणे चौकशी करून अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
हवेली तालुक्यातील आदिवासी कातकरी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आदिवासी महिलांना आधार कार्ड, मोबाईल क्रमांक लिंक करणे, बँक खाते उघडणे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात महिलांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
केवळ योजनांची घोषणा करून उपयोग नाही, तर त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. आदिवासी कातकरी महिलांच्या समस्या सोडविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार बंद करण्याची मागणीही संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.
प्रशासनाला जाग कधी येणार?
आदिवासी कातकरी महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी खडकवासला आणि एनडीए गेट परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार कार्ड नसलेल्या महिलांची नोंदणी, आधारला मोबाईल क्रमांक जोडणे, बँक खाते उघडणे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत प्रशासनाने विशेष पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी कातकरी महिलांना वंचित राहावे लागत असेल, तर ही केवळ प्रशासकीय त्रुटी नसून शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. खऱ्या गरजू महिलांना न्याय मिळणार कधी आणि प्रशासनाला जाग येणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.











