
खडकवासला विधानसभा मतदारसंघात SIR मोहीम युद्धपातळीवर सुरू; 8 ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत असल्याने नागरिकांनी तातडीने मतदार पडताळणी करुन घेण्याचे हवेली उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने व हवेली तहसीलदार डॉ.अर्चना निकम यांचे आवाहन; खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सुमारे तीन लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता
खडकवासला विधानसभा मतदारसंघात SIR मोहीम युद्धपातळीवर सुरू; 8 ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत असल्याने नागरिकांनी तातडीने मतदार पडताळणी करुन घेण्याचे हवेली उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने व हवेली तहसीलदार डॉ.अर्चना निकम यांचे आवाहन; खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सुमारे तीन लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता
(निलेश बोरुडे: संपादक – द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)
पुणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सघन पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेअंतर्गत खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदार पडताळणी, Enumeration Form (EF) वितरण, डिजिटायझेशन आणि पंचनामा अपलोडचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती हवेली उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली. साई सिंहगड कॉलेज, आंबेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी हवेली तहसीलदार डॉ. अर्चना निकम, नायब तहसीलदार सचिन आखाडे आदी उपस्थित होते.
डॉ. माने यांनी सांगितले की, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक यंत्रणा सातत्याने कार्यरत असून उर्वरित काम विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मतदारांनी देखील आपल्या नावाची पडताळणी करून Enumeration Form वेळेत भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करावा अथवा उपलब्ध ऑनलाइन सुविधेचा वापर करून सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. 2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंतची प्रगती पुढीलप्रमाणे आहे :
एकूण मतदार : 517,114
प्रशिक्षित BLO : 505 (100%)
EF प्रिंट : 517,114
EF वितरित : 314,662
EF डिजिटायझेशन पूर्ण : 204,479
मतदारांनी स्वतः सादर केलेले EF : 9,376
ASD विसंगती प्रकरणे : 2,237
DSE प्रकरणे : 10,114
PSE प्रकरणे : 24,173
दरम्यान, प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, अनुपलब्ध अथवा पत्ता न सापडलेले तसेच इतरत्र नोंद असलेले मतदार यांची माहिती संकलित करून नियमानुसार पंचनामे तयार करण्याचे आणि त्यांचे ऑनलाइन अपलोड करण्याचे काम देखील सुरू आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुमारे तीन लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे मतदारांनी 8 ऑगस्टपूर्वी आपली नोंदणी आणि पडताळणी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी आणि निवडणूक कर्मचारी या मोहिमेसाठी पूर्ण क्षमतेने काम करत असून, अंतिम मुदतीपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास संबंधित BLO किंवा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन हवेली उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने आणि हवेली तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांनी केले आहे.











