
नांदोशी येथील रस्त्याची दुरवस्था; पुणे मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
नांदोशी येथील रस्त्याची दुरवस्था; पुणे मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण
पुणे: सिंहगड रस्त्यालगतच्या नांदोशी परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळा सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर इतके मोठे खड्डे पडले आहेत की पायी चालणेही कठीण झाले आहे. दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका वाढला असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकदा किरकोळ अपघात घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांनी अनेक वेळा पुणे महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
नांदोशी परिसरातील नागरिकांनी पुणे महानगरपालिकेने तात्पुरत्या डागडुजीवर वेळ आणि पैसा खर्च न करता संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी केली आहे. आणखी मोठे अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशीही मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.








