
Cluster School:राज्यातील पहिल्या समुह शाळेचा प्रयोग यशस्वी; शासनाच्या उपक्रमाला मुख्याध्यापिका-शिक्षकांची साथ; पानशेत जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या 92 वरुन 154 वर!
राज्यातील पहिल्या समुह शाळेचा प्रयोग यशस्वी; शासनाच्या उपक्रमाला मुख्याध्यापिका-शिक्षकांची साथ; पानशेत जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या 92 वरुन 154 वर!
पुणे: दुर्गम डोंगराळ भाग, स्थलांतरामुळे वाड्यावस्त्यांवरील शाळांची रोडावत चाललेली विद्यार्थी संख्या, कमी पट असल्याने शिक्षक संख्येची मर्यादा आणि एकूणच अत्यंत बिकट स्थितीत असलेली आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाची अवस्था यावर आपले तत्कालीन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी वेगळा विचार करुन उपाय शोधला! पानशेत परिसरातील वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थी संख्या एका ठिकाणी एकत्रित करुन ‘समुह शाळेचा’ (cluster School) राज्यातील पहिला प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. जानकीदेवी बजाज फाउंडेशन या उपक्रमासाठी पुढे सरसावले आणि निधी उपलब्ध करून दिला.
प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि बघता बघता आकर्षक इमारत उभी राहिली. तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक प्रविण खिरीड यांनी इमारत उभारणी व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली. ग्रामपंचायत समिती सदस्य महादेव पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित बैठक व्यवस्था उपलब्ध करून दिली. 15 जून 2023 रोजी ही राज्यातील पहिली समुह शाळा प्रत्यक्षात सुरू झाली. राज्याचे प्रधान सचिव, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी असे वरिष्ठ अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी येऊ लागले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद स्वतः जातीने या शाळेकडे लक्ष ठेवून होते.
समुह शाळा उभी तर राहिली परंतु हा प्रयोग यशस्वी होईल की नाही याबाबत विविध स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. प्रभारी मुख्याध्यापिका शबाना जावेद खान यांनी हा प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली. सहशिक्षक असलेल्या सावित्री वसईकर, शुभांगी थिटे, प्रज्ञा जवळकर, अतुल बागडे व माधवी जगताप यांची मुख्याध्यापिका शबाना खान यांना साथ लाभली आणि चित्र बदलायला सुरुवात झाली. मुख्याध्यापिका शबाना खान यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणपुरक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी धडपड केली. सुरुवातीला 92 असलेली विद्यार्थी संख्या आता 154 वर जाऊन पोचली आहे! दैनंदिन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विशेष वर्ग घेतले जात आहेत. पानशेत येथील समुह शाळा आता राज्यातील इतर दुर्गम भागासाठी एक रोल मॉडेल म्हणून समोर येत आहे.










