
अखेर दणका…. खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्या विरोधात ‘तक्रारींचा पाऊस’ नियमबाह्य व मनमानी कारभारार असल्याचे चौकशीतून निष्पन्न; बदली, सक्तीची रजा किंवा पदभार काढून घ्या; कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विशेष अधीक्षकांचे शासनाला अहवालासह पत्र
अखेर दणका…. खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्या विरोधात ‘तक्रारींचा पाऊस’ नियमबाह्य व मनमानी कारभारार असल्याचे चौकशीतून निष्पन्न; बदली, सक्तीची रजा किंवा पदभार काढून घ्या; कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विशेष अधीक्षकांचे शासनाला अहवालासह पत्र
पुणे: खडकवासला पाटबंधारे मंडळाच्या वादग्रस्त कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्या विरोधातील तक्रारींची अखेर प्रशासनाने दखल घेतली असून त्यांची तातडीने बदली करण्यात यावी किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे किंवा संवेदनशील असलेल्या खडकवासला पाटबंधारे मंडळाचा पदभार इतर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात यावा असे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे विशेष अधीक्षक शाम हिंगे यांनी मंत्रालयातील जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे या सोबत तब्बल 104 पानांचा अहवाल जोडण्यात आलेला आहे.
कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्याबाबत अनेक तक्रारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही तर संबंधित तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे चौकशीत दिसून आल्याचेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्यावर शासन स्तरावरून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. सोशल मीडियावर ‘Active‘ असलेल्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्यावर आता शासन स्तरावरून काय ‘Action‘ घेतली जातेय हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
अधिकारी कर्मचाऱ्यांवर मनमानी पद्धतीने वचक ठेवण्याचा प्रयत्न
कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक ठेवण्यासाठी आपल्या पदाचा धाक दाखवून सातत्याने कुरघोड्या केल्याची चर्चा नेहमी ऐकायला मिळत होती. याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखी स्वरूपात तक्रारही केली होती. त्यामुळे खडकवासला पाटबंधारे मंडळात ‘शीतयुद्ध’ सुरू होते.
‘तो’ पूर आलाच नसता!
25 जुलै 2024 रोजी खडकवासला धरणातून अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यावेळी पाटबंधारे विभागाकडून पालिकेला चुकीची माहिती देऊन प्रत्यक्षात त्यापेक्षा दुप्पट निसर्ग सोडण्यात आल्याने एकता नगर परिसरात अनेक नागरिकांना त्याचा फटका बसला होता. यामध्ये कारण नसताना पालिकेच्या तत्कालीन सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी खडकवासला पाटबंधारे विभागाने केलेली लपवाछपवी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने पुराव्यासह मांडली होती. तो पूर येण्यामागे कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे व इतर अधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव आणि श्वेता कुऱ्हाडे यांची मनमानी असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते. त्यावेळी हे प्रकरण दडपण्यात आले होते.
कधीच उत्तर नाही !
खडकवासला धरण साखळीतील विविध विषयासंदर्भात श्वेता कुऱ्हाडे यांच्याकडून त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्या कधीच फोनला उत्तर देत नव्हत्या. दुसऱ्या बाजूला त्या सोशल मीडियासाठी मात्र पुरेपूर वेळ देताना दिसत होत्या. त्यामुळे जाणीवपूर्वक त्या उत्तर देणे टाळत होत्या का? असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे.









