
किरकटवाडी येथील गादी कारखाना जळून खाक; सुमारे तीन लाखांचे नुकसान; शॉर्टसर्कीटमुळे आग लागली असल्याचा अंदाज
किरकटवाडी येथील गादी कारखाना जळून खाक; सुमारे तीन लाखांचे नुकसान; शॉर्टसर्कीटमुळे आग लागली असल्याचा अंदाज
किरकटवाडी: किरकटवाडी गावच्या हद्दीत मुख्य सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या अमृता विहार सोसायटीतील शिवशक्ती गादी कारखाना या दुकानाला आग लागून सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण तांदळे यांचा हा गादी कारखाना असून शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
काल दुपारच्या सुमारास कारखाण्याला आग लागली होती. कापूस व तयार गाद्या असल्याने वेगाने आग पसरली. काही वेळात लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. याबाबत माहिती मिळताच नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे वाहन घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळविले.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्य करणाऱ्या लक्ष्मण तांदळे यांचे या आगीत सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.








