
IMPACT: जे. पी. नगर येथील शौचालयाची तातडीने स्वच्छता;द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर पालिकेची तत्परतेने कारवाई; दुरुस्ती व कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याबाबत सूचना दिल्याची सहाय्यक आयुक्तांची माहिती
IMPACT: जे. पी. नगर येथील शौचालयाची तातडीने स्वच्छता;द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर पालिकेची तत्परतेने कारवाई; दुरुस्ती व कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याबाबत सूचना दिल्याची सहाय्यक आयुक्तांची माहिती
पुणे: सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या नांदेड गावच्या हद्दीतील जयप्रकाश नारायण नगर येथील सार्वजनिक शौचालयाची जेटींग मशीन लावून तातडीने स्वच्छता करण्यात आली आहे. नागरिकांच्या संतप्त भावना द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने पालिका प्रशासनापर्यंत पोचविल्यानंतर तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे रंगरंगोटी, दुरुस्ती व कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नामदेव बजबळकर यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ला दिली आहे.

जयप्रकाश नारायण नगर येथील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली होती. अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी हनुमंत शिवूर यांनी निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली होती, तसेच दखल न घेतल्यास सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात शौचाला बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या विषयाबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने बातमी करुन पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते.
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली व शौचालयाची पाहणी करून जेटींग मशीन लावून शौचालयासह संपूर्ण परिसराची स्वच्छता करुन घेतली. तसेच या ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. परिसरातील काही उपद्रवी समाजकंटक शौचालयातील पाण्याचे नळ, दरवाजे, वरिल टाक्या आदींची जाणूनबुजून तोडफोड करत असल्याबाबत अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शौचालय व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य असणे आवश्यक असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
“जेटींग मशीनच्या सहाय्याने शौचालय व परिसराची स्वच्छता करुन घेण्यात आली आहे. सदर ठिकाणी वाढीव नळजोडणी देणे व पाण्याची वेळ वाढविण्यासंदर्भातील सूचना पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता आकाश गावित यांना दिल्या आहेत. तसेच शौचालयाची रंगरंगोटी व आवश्यक ती दुरुस्ती करुन घेण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयाच्या उप अभियंत्यांना केल्या आहेत. नागरिकांनी शौचालयातील वस्तूंची मोडतोड करु नये.” नामदेव बजबळकर, सहाय्यक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा.