
स्वातंत्र्य दिनापासून आदिवासी कातकरी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात अन्नत्याग आंदोलन; खडकवासला धरणामागे फुटपाथवर बसणार हवेली व राजगड (वेल्हे) तालुक्यातील शेकडो कातकरी
स्वातंत्र्य दिनापासून आदिवासी कातकरी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात अन्नत्याग आंदोलन; खडकवासला धरणामागे फुटपाथवर बसणार हवेली व राजगड (वेल्हे) तालुक्यातील शेकडो कातकरी
पुणे: देशाच्या स्वातंत्र्याला तब्बल 78 वर्षे पूर्ण झाले तरीही मुलभूत हक्क आणि अधिकारापासून वंचित असलेल्या खडकवासला, सिंहगड, पानशेत व आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी कातकरी नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वातंत्र्य दिनी सकाळी 11 वाजल्यापासून खडकवासला-एनडीए रस्त्यावर फुटपाथवर बसून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असून त्याबाबत संबंधित सर्व विभागांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पश्चिम हवेली व राजगड तालुक्यातील शेकडो आदिवासी कातकरी महिला व पुरुष या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत.
मागील अनेक वर्षांपासून आदिवासी कातकरी नागरिकांना शासकीय कागदपत्रे, हक्काचे घर मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद अशा सर्व विभागांचे लक्ष वेधूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. तात्पुरती मलमपट्टी किंवा दिखावा शिबीर आयोजित करुन बोळवण केली जाते. याचा फटका या आदिवासी कातकरी नागरिकांना बसत आहे.
आधार कार्ड नसल्याने मुलांना शाळेत बसता येत नाही. आधार कार्ड नसल्याने रेशनकार्ड तयार होत नाही. गरज असताना मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ मिळत नाही. जातीचे दाखले नसल्याने शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. जागा उपलब्ध नसल्याने शबरी आवास योजना, घरकुल योजना यांचा लाभ मिळत नाही.परिणामी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोडक्या तोडक्या झोपड्यांमध्ये रहावे लागत आहे. संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी सर्व परिस्थिती माहित असताना अपेक्षित कार्यवाही करत नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.








