सिंहगड रस्त्यावरील NWA गेट जवळ बसविण्यात आलेले धोकादायक गतीरोधक अखेर काढले; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही
किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान बसविण्यात आलेले धोकादायक व अनावश्यक गतीरोधक अखेर काढून टाकण्यात आले आहेत. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत हे गतीरोधक व खिळे काढून घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी NWA गेट जवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रबरी गतीरोधक बसविण्यात आले होते. अनावश्यक ठिकाणी तसेच कोणतीही खबरदारी न घेता गतीरोधक बसविल्याने अवघ्या काही दिवसांत अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले, तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड, पुणे मनपा पथ विभागाचे उप अभियंता नरेश रायकर यांचे बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले होते.
निकृष्ट दर्जाचे गतीरोधक असल्याने आठवड्यात त्याचे तुकडे निघून गेले होते मात्र धोकादायक खिळे रस्त्यावर असल्याने टायर फुटण्याचा धोका होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अगोदर खिळे काढून घेतले व त्यानंतर अनावश्यक असलेले पूर्ण गतीरोधक काढून टाकण्यात आले आहेत. याबाबत तातडीने कार्यवाही झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.