
Murder: डोक्यात गोळी घालून तरुणाची हत्या; पुणे पानशेत रस्त्यावरील डोणजे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलाखाली फेकला मृतदेह; पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू; निवडणूक तोंडावर असताना खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ
Murder: डोक्यात गोळी घालून तरुणाची हत्या; पुणे पानशेत रस्त्यावरील डोणजे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलाखाली फेकला मृतदेह; पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू; निवडणूक तोंडावर असताना खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ
(निलेश बोरुडे: संपादक- द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)
पुणे: पुणे महापालिकेची निवडणूक अवघ्या एक दिवसावर आलेली असताना व पुणे जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली असतानाच पुणे पानशेत रस्त्यावरील डोणजे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलाखाली तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशाल संजय चव्हाण (वय अंदाजे 25 रा शिवनगर-कोल्हेवाडी, किरकटवाडी ता. हवेली जि. पुणे ) असे मृत तरुणाचे नाव असून डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पुलाखाली मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी व पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.
दरम्यान हत्या नेमकी कोणी व का केली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसून किरकोळ वादातून हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. विशाल चव्हाण याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. त्याचा काही संदर्भ आहे का हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. घटना नेमकी कोणत्या ठिकाणी घडली, आरोपी कोण कोण आहेत, मृतदेह कधी नेऊन टाकण्यात आला याबाबत अधिक माहिती पोलीस तपासून स्पष्ट होणार आहे.








