किरकटवाडी येथे आधार नोंदणी, अद्ययावतीकरण व इतर योजनांसाठी शिबीर सुरु; खडकवासला पोस्ट कार्यालय व नरेंद्र हगवणे यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑगस्ट पर्यंत आयोजन
- किरकटवाडी: भारतीय पोस्ट विभागाचे खडकवासला पोस्ट कार्यालय व किरकटवाडीचे माजी उपसरपंच आर्किटेक्ट नरेंद्र हगवणे यांच्या संयुक्त विद्यमाने किरकटवाडी येथील भैरवनाथ मंदिराजवळ असलेल्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या शिबीराला सुरुवात झाली असून 10 ऑगस्ट पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबिर सुरू असणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन पोस्ट अधिकारी व नरेंद्र हगवणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिरात नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड मधील दुरुस्ती, जनरल इन्शुरन्स, सुकन्या समृद्धी योजना, बचत खाते व भारतीय डाक विभागाच्या इतर योजनांचा लाभ घेता येणार आहे. पोस्ट विभागाचे जनसंपर्क निरिक्षक महेश शिंदे, पोस्टल सहाय्यक गौरी राहिंज, पोस्टमन हनुमंत बाऱ्हाळे यांचे या शिबीरासाठी विशेष सहकार्य असणार आहे.
शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी नरेंद्र हगवणे यांच्याकडून व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच अर्ज भरण्यासाठीही नरेंद्र हगवणे यांच्याकडून दिवसभर उपस्थित राहून मार्गदर्शन व मदत करण्यात येत आहे. अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.