पारंपारिक तालवाद्यांच्या गजरात मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी किरकटवाडी येथे पार पडली भव्य मिरवणूक
पुणे : अखिल किरकटवाडी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. भव्य ढोलपथक, हलगी पथक, पोतराज व मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी किरकटवाडी फाटा ते गावापर्यंत पालखी सोहळा पार पडला. पारंपारिक स्वरूपात आयोजित करण्यात आलेला हा सोहळा पाहण्यासाठी गावातील शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
अखिल किरकटवाडी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबविले जातात. यावर्षी रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दरवर्षी प्रमाणे यंदाही डिजेला फाटा देऊन पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला होता. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी गावातील सर्व तरुण व ज्येष्ठ कार्यकर्ते आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसत होते. कलाकारांना आर्थिक बळ देऊन सांस्कृतिक परंपरा जोपासणारा किरकटवाडीचा शिवजन्मोत्सव शांततेत पार पडला.