
खानापूर मधील अवैध दारू धंदे ‘जैसे थे’; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हवेली पोलीसांना खडसावूनही बदल नाही
खानापूर मधील अवैध दारू धंदे ‘जैसे थे’; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हवेली पोलीसांना खडसावूनही बदल नाही
खानापूर: नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत खानापूर परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी पोलीसांसमोर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोर केल्यानंतर चाकणकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र एकदोन दिवस दिखावा केल्यानंतर खानापूर येथील चार ठिकाणी सुरू असलेले अवैध दारू धंदे ‘जैसे थे’ सुरू आहेत. या धंदे वाल्यांना पाठीशी घालणारा ‘चालक’ किती निर्ढावलेला आहे हे यावरून दिसून येत आहे.
खानापूर येथे सातत्याने गुन्हेगारी घटना घडत असल्याने नागरिकांच्या विनंतीवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 1 जुलै 2025 रोजी सायंकाळी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने या बैठकीसाठी आले होते. यावेळी अनेक महिला व पुरुषांनी सराईत गुन्हेगारांची दहशत, अवैध धंदे यांबाबत संताप व्यक्त केला. तसेच हवेली पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याकडे चाकणकर यांचे लक्ष वेधले होते. महत्वाचे म्हणजे हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी व हवेली पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांच्या समक्ष नागरिकांनी परिसरातील वास्तव मांडले होते.
त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी पोलीसांना चांगलेच सुनावले होते व तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर काही दिवस परिसरातील अवैध धंदे ‘बंद ठेवण्यात आले होते’ मात्र अवघ्या काही दिवसांत परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. गावातील अव दारू धंदे सुरू असून त्यांना कोणाचीच भीती नसल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील अल्पवयीन मुले गांजाच्या व्यसनाच्या आहारी गेल्यानेही नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटना आणि अवैध धंदे या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून याबाबत कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.








