व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ व वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात सिंहगड परिसरातील नागरिक एकवटले; नागरिकांनी व्यक्त केल्या तीव्र भावना; नाकर्तेपणामुळे इज्जतीचा पंचनामा झालेला असताना पाठ थोपटून घेण्यासाठी पोलीसांनी तयार केले काही ‘एजंट’
व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ व वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात सिंहगड परिसरातील नागरिक एकवटले; नागरिकांनी व्यक्त केल्या तीव्र भावना; नाकर्तेपणामुळे इज्जतीचा पंचनामा झालेला असताना पाठ थोपटून घेण्यासाठी पोलीसांनी तयार केले काही ‘एजंट’
सिंहगड: नामवंत व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण आणि निर्घृण हत्येच्या निषेधार्थ व वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश सभेत परिसरातील गावांतील तब्बल पाचशे ते सहाशे नागरिक उत्स्फूर्तपणे एकवटलेले दिसले. या जन आक्रोश सभेत बोलताना नागरिकांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त करत गुन्हेगारी संपविण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली.
डोणजे येथील ऐतिहासिक अमृतेश्वर मंदिराच्या आवारात या जन आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक पासून ते थेट पानशेत पर्यंतच्या गावांतील नागरिक वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात एकत्र जमले होते. अशा घटना यापुढे होऊ नयेत म्हणून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी बोलताना व्यक्त केली. तरुण, ज्येष्ठांसह महिलाही या निषेध सभेत दहशतीला न जुमानता सहभागी झाल्याच्या दिसल्या.
पोलीसांविषयी चांगलं बोला!
सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. हवेली पोलीसांचा हद्दीत कसलाही वचक दिसत नाही. पोलीसांविषयी नागरिकांच्या मनात अत्यंत चीड निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपल्या कामात सुधारणा करुन नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याऐवजी पोलीसांनी काही “एजंट’ तयार करुन आमच्याविषयी चांगलं बोला असे त्यांना सांगितल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ला दिली.
ती भीती कोण दाखवतंय?
पोलीसांविषयी चांगलं लिहा नाहीतर पोलीस चार्जशीट चांगलं पाठविणार नाहीत असे एक व्यक्ती अनौपचारिकपणे बोलताना म्हटला. हे विधान अत्यंत धक्कादायक असून ही भीती कोणी घातली की जर वास्तव लिहिले तर पोलीस चार्जशीट चांगली पाठविणार नाहीत. पोलीसांनी त्यांचे काम करावे. चांगलं काम केलं तर चांगलं लिहिलं जाईल यात शंका नाही परंतु अवैध धंदे आणि गुन्हेगारीला खतपाणी घालून खाकी वर्दीला कलंक लावायचा आणि वरुन चांगलं लिहून कौतुकाची अपेक्षा करायची हे निंदा जनक आहे.
मनाला काही वाटत नसेल का?
जन आक्रोश सभेत एका पोलीस अधिकाऱ्याने सहानुभूती मिळावी म्हणून एक वक्तव्य केले. लोक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत असे ते अधिकारी म्हणाले. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत कारण त्यांच्या मनात पोलीसांविषयी विश्वास उरलेला नाही. लोक जेव्हा तक्रार करण्यासाठी जातात तेव्हा त्याची माहिती पैशाला हापापलेले आणि गुन्हेगार व अवैध धंदेवाल्यांचे गुलाम झालेले पोलीस त्यांना माहिती पुरवितात. पोलीस आणि गुन्हेगार यांची छुपी युती असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि दुर्दैवाने त्याला पोलीसच जबाबदार आहेत. त्यामुळे जेव्हा पोलीस नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत असे म्हणतात तेव्हा त्यांच्या मनाला काही वाटत नसेल का?
‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या निर्भीड लेखनाचे कौतुक!
लाळघोटी पत्रकारिता न करता व्यवस्थेच्या विरोधात व सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने निर्भीडपणे लेखन करत असल्याबाबत व खंबीरपणे नागरिकांचा आवाज वरिष्ठांपर्यंत पोचवत असल्याबाबत नागरिकांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या कामाचे कौतुक केले. पोलीसांच्या मनमानी कारभाराला द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ मुळे चाप लागला आहे असे म्हणत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशाच प्रकारे निर्भीडपणे लेखन करत व्यवस्थेला आरसा दाखविण्याचे काम करत राहावे अशीही सदीच्छा नागरिकांनी व्यक्त केली. ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ दहशत, लालच किंवा ‘दिडदमडीच्या’ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या दबावाला कधीही घाबरणार नाही असा विश्वास यावेळी त्यांना दिला.
अपप्रचाराने साध्य काय होणार?
द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या लिखाणामुळे स्वार्थ दुखावलेले हवेली पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि काही भ्रष्ट कर्मचारी अपप्रचार करत असून पोलीसांच्या विरोधात जाणीवपूर्वक लिखाण केले जात असल्याचे सांगत आहेत. परंतु ‘हाताच्या काकणाला आरसा कशाला?’ पाहिजे. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ बाबत पोलीसांनी कितीही अपप्रचार केला तरी त्यांचा खरा चेहरा उघडा पडत असून ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ त्यांना त्यांची जागा दाखवून देत आहे. अत्यंत गलीच्छ काम करायचे आणि त्या विरोधात कोणी लिहित असेल तर त्याबाबत अपप्रचार करुन बदनामी करण्याचा प्रयत्न करायचा यातून काहीही साध्य होणार नाही हे पोलीसांनी लक्षात घ्यायला हवे. लोक तोंडावर साहेब म्हणत असले तरी हद्दीत लायकी निघत आहे याची माहिती काढून जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी आणि अपप्रचार थांबवून आपल्या कामाकडे लक्ष द्यायला हवे.