बोगस पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट चा भांडाफोड; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; कागदपत्रे तपासून घेण्याचे कंपन्यांना आवाहन
बोगस पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट चा भांडाफोड; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; कागदपत्रे तपासून घेण्याचे कंपन्यांना आवाहन
(निलेश बोरुडे: संपादक -द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)
पुणे: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी शाखेचे पोलिस निरीक्षक विकास राऊत यांच्या पथकाने दिघी पोलीस स्टेशन हद्दीतील एका नामांकित कंपनीत कामगारांनी सादर केलेल्या बोगस पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटचा भांडाफोड केला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सुचनेनुसार परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बोगस पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवून देणारे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून कंपन्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीसांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठमोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. देशभरातील कामगार कामासाठी या परिसरात येतात आणि वास्तव्य करतात. यामध्ये काही गुन्हेगार असण्याची शक्यता असते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी महत्वाच्या कंपन्या, लष्करी आस्थापना येथील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट तपासण्याच्या सूचना सर्व पोलीस स्टेशन प्रभारी व विविध तपासणी पथकांना दिलेल्या आहेत. त्यानुसार दिघी पोलीस स्टेशन हद्दीतील एका कंपनीतील कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट तपासले असता दहशतवाद विरोधी शाखेचे पोलिस निरीक्षक विकास राऊत यांना शंका आली.
पुणे शहर विशेष शाखेकडे या व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटची खातरजमा केली असता अनेक सर्टिफिकेट बोगस असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी दोषींवर दिघी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी , परिमंडळ तीनचे उपायुक्त तथा दहशतवाद विरोधी शाखेचे नियंत्रक डॉ शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास राऊत, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, कॉन्स्टेबल पुंडलिक पाटील, अरुण कुटे, सुरज मोरगावकर व तुषार कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.