निर्भया पथक कोमात, वसुली पथक मात्र जोमात!…….. चिमुकलीवर अत्याचार झाल्याने हवेलीच्या हद्दीतील अवैध धंद्यांचा प्रश्न ऐरणीवर
खडकवासला: हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अगोदरच महिला व मुलींच्या संदर्भाततील गुन्ह्यांची संख्या लक्षणीय असताना दोन दिवसांपूर्वी एका पाचवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली. सातत्याने चोऱ्या, घरफोड्या होत असून लाखोंचा ऐवज चोरीला जात आहे. चोरांचा शोध घेणे तर दूर नागरिक आमची किमान तक्रार तरी दाखल करुन घ्या अशा विनवण्या करत पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवत आहेत. मात्र संवेदनाहीन झालेल्या हवेली पोलीसांना त्याचे काहीही घेणदेणे असल्याचे दिसत नाही. कदाचित अवैध धंदेवाल्यांचे लांगूलचालन करुन त्यांना सुरक्षा पुरविण्यात हवेली पोलीस धन्यता मानत असावेत!
हवेली पोलीस ठाण्यातील निर्भया पथकासाठी मागील काही महिन्यांपासून वाहन नाही. अगोदर जे वाहन होते ते साहेबांच्या दिमतीला होते. ते वाहन नादुरुस्त होऊन पडले आणि अगोदरच कागदावर असलेले निर्भया पथक निर्वाहन झाले! विशेषतः शाळांमध्ये जाऊन मुलींशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात हा निर्भया पथका मागचा उद्देश आहे, मात्र निर्भया पथक मुलींपर्यंत जातच नसेल तर त्याचा उपयोग काय? मुलींच्या तक्रारींची पोलीसांनी वेळीच दखल घेतली आणि त्यावर कारवाई केली तर गंभीर गुन्हे रोखले जाऊ शकतात, परंतु त्यात हवेली पोलीसांना ‘इंटरेस्ट’ असल्याचे दिसत नाही.
दुसऱ्या बाजूला राजरोसपणे हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत. त्यासाठी विशेष वसुली पथक कार्यरत असल्याचे ऐकायला मिळत आहे. वरिष्ठांकडून कारवाईबाबत काही माहिती आल्यास हे पथक तातडीने त्याचा निरोप अवैध धंदेवाल्यांपर्तंत पोचवून त्यांची इमानेइतबारे सेवा करत आहे. मागे काही दिवसांपूर्वी दाखविण्यासाठी छापा टाकून ‘दोन दोन मग’ मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक सोशल मिडीयाच्या माध्यमातून जाहिरपणे अवैध धंद्यांबाबत बोलत आहेत मात्र हवेली पोलीस डोळ्यांवर पट्टी बांधून कानात हेडफोन घालून ‘मेरा सपना मनी मनी’ एवढंच गाणं ऐकत आहेत अशी परिस्थिती दिसून येत आहे.