राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरातीमागून घोडे; अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत दोघांचा जीव घेतल्यानंतर 32 परवाना कक्ष अनुज्ञप्तीवर कारवाई
पुणे: कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात 14 पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत 32 विविध परवाना कक्ष अनुज्ञप्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या अनुज्ञप्तींचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्यात आले असून सर्व अनुज्ञप्ती सील करण्यात आलेल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही कारवाई म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
या कारवाईत 10 रूफटॉप, अंदाजे 16 पब, इतर 6 परवाना कक्ष बार अशा एकूण 32 अनुज्ञप्तींचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्याचे आदेश पारित केले असून सर्व अनुज्ञप्ती सील करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात धडक मोहिम राबविण्यात येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वारंवार अनुज्ञप्तींच्या गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्यात येते. कोझी बारवर आता अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद केल्याची कारवाई केलेली असली तरी दोन महिन्यापूर्वीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने विभागीय गुन्हा नोंद केलेला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग नियोजनबद्ध कारवाई करीत असून अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर सुरू ठेवणे, अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणे किंवा इतर संदर्भात नागरिकांच्या तक्रारी असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअप क्रमांक ८४२२००११३३ वर तक्रार देण्याचे आवाहान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी केले आहे.