मला सध्या काहीही बोलायचं नाही पण मी….
पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात युद्धपातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना देऊन कामाला लागण्यास सांगितले आहे. तसेच जे पदाधिकारी सोबत नाहीत त्यांना फोन करून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारजे भागातील माजी नगरसेविका सायली वांजळे यांना फोन केल्याचे ऐकायला मिळत आहे.
याबाबत माजी नगरसेविका सायली वांजळे यांच्याशी संपर्क साधला असता ‘फोन आला होता की नाही हे जाहिरपणे सांगू इच्छित नाही परंतु मी ताईंसोबत आहे आणि ताईंसोबतच राहणार असल्याचे’ त्यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ शी बोलताना स्पष्ट सांगितले आहे. दादांनी मला तिकीट दिले म्हणून मी नगरसेविका झाले हे मी कधीही विसरणार नाही परंतु ताईही नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. खुप कामे ताईंमुळे झालेली आहेत. स्थानिक लोकांची भावना वेगळी असून त्या भावनेचा आदर करत मी ताईंसोबतच राहणार असल्याचेही वांजळे यांनी स्पष्ट सांगितले आहे.
दादांचा फोन आला होता की नाही? या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र सायली वांजळे यांनी टाळले असून आपण याबाबत जाहिरपणे काहीही बोलणार नसल्याचे सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र बारामती मतदारसंघाच्या बांधणीबाबत स्वतः लक्ष घातल्याचे दिसून येत असून त्यासाठी ते सातत्याने आढावा बैठका घेत आहेत.