खडकवासला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा आमदार असेल; लोकसभेत सपाटून मार बसल्याने आता ‘लाडकी बहीण आठवली’; खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारला टोला; महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाभ दुप्पट करण्याचे आश्वासन; कोंढणपूर येथे पार पडला ‘सिंहगडाच्या निष्ठावंत शिलेदारांचा आभार मेळावा’
- सिंहगड: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार बसल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ‘लाडकी बहीण योजना’ आणली आहे असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला लावला. माता भगिनींना मिळणारा हा लाभ सरकार खिशातून देणार नाही. लवकरच हे सरकार बदलणार आहे आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेचा लाभ दुप्पट करण्यात येईल असेही आश्वासन सुळे यांनी उपस्थित महिलांना दिले. बारामती लोकसभा मतदारसंघात चौथ्यांदा विजयी झाल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे व पूजा पारगे यांच्या वतीने खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कोंढणपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंहगडाच्या निष्ठावंत शिलेदारांचा आभार मेळावा’ या कार्यक्रमात सुळे बोलत होत्या.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात वाजलेल्या तुतारीचा आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. महा विकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी त्याबद्दल आभार मानते. प्रचंड दबाव असताना येथील निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते डगमगले नाहीत. विशेषतः येथील मतदारांनी आपली भावना मतदानातून व्यक्त केली आणि मला विजयी केले. या विजयामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली असून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवली. यावेळी काकासाहेब चव्हाण,लहू निवंगुणे, रवींद्र मुजुमले, गणपत खाटपे, नितीन वाघ, पूजा पारगे, अनिता इंगळे, अभयसिंह कोंडे, बाळासाहेब मोकाशी, सचिन बराटे, किसन जोरी, सचिन पासलकर, बाप्पूसाहेब चव्हाण, पोपट चोरघे, राखी तागुंदे , सीमा पढेर, निलेश वांजळे, राजेंद्र सोनवणे, सुधाकर गायकवाड, राहुल सोनवणे, आदित्य बोरगे, अर्जुन पारगे, आदित्य हवालदार, हनुमंत शिवूर, रघुनाथ यादव, संजय पवार, पूनम मते, सौरभ कोंडे, रेश्मा चोरघे, सागर घोगरे, शफीक तांबोळी, सचिन दोडके, नरेंद्र हगवणे, संदीप हगवणे, सुनील पायगुडे, त्र्यंबक मोकाशी, तानाजी पवळे, राहुल मते, श्रीरंग चव्हाण, खुशाल करंजावणे, मोनिश कडू, नवनाथ पारगे आदी उपस्थित होते.
खडकवासल्याचा आमदार ‘महाविकास आघाडीचाच’ असणार
खडकवासला विधानसभा मतदारसंघ आपल्या पक्षाला मिळावा अशी भावना शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारीही याबाबत बोलले. त्याबाबत अत्यंत सूचक उत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देत खडकवासला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचाच आमदार होणार आहे असे म्हटले. तसेच ज्या घटक पक्षाचा उमेदवार असेल त्यासाठी सर्वांनी लोकसभेला एकजुटीने काम केले तसेच काम करायचे आहे असे आवाहनही सुळे यांनी केले.
सर्वांशी चर्चा करुनच निर्णय
खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवार ठरविताना सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेतले जाणार असून एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
सरकार बदलायचे आहे
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी आतापासूनच एकजुटीने कामाला लागायचे आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार, विद्यार्थी, कामगार अशा सर्वांचे प्रश्न सोडविण्यात सध्याचे सरकार अपयशी ठरत आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. सध्याच्या सरकारवर नागरिक नाराज असून त्याला सक्षम पर्याय आपण देणार आहोत. हे सरकार आपल्याला बदलायचे आहे आणि ते शंभर टक्के बदलणार आहे असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायचे आहे सध्याचे सरकार सर्व निर्णय दिल्लीला विचारुन घेत आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. महाराष्ट्र स्वाभिमानी असून स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारे सक्षम सरकार आपल्याला आणायचे आहे असा निर्धार सुळे यांनी व्यक्त केला.