
खडकवासला कालव्यावर आंघोळीसाठी गेलेला व्यक्ती बुडाला; अग्निशमन दलाकडून शोध सुरू
पुणे: खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला यशवंत विद्यालयाजवळ अंघोळीसाठी गेलेला व्यक्ती कालव्यात बुडाल्याची घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मनोज पुनिया (वय 45, रा. खडकवासला, मुळ रा. सुरु, राजस्थान) असे बुडालेल्या व्यक्तीचे नाव असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या जवानांकडून सकाळपासून कालव्यात शोध घेतला जात आहे.

मनोज पुनिया हे खडकवासला येथे छोटेसे हॉटेल चालवून स्वतःसह तीन मुलांचा उदरनिर्वाह करत होते. तसेच सकाळच्या वेळेत आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या मुलांचे मैदानी चाचणीसाठी प्रशिक्षण वर्ग घेत होते. अत्यंत कष्टाळू असलेले मनोज पुनिया हे शांत स्वभावाचे होते. दररोज सकाळी आंघोळीसाठी ते मुलांसह कालव्यावर येत असत. पोहता येत नसल्याने ते कडेला आंघोळ करून जात होते.
आज सकाळी नेहमीप्रमाणे पुनिया मुलांसह कालव्यावर आंघोळीसाठी आले आसता त्यांचा तोल गेल्याने ते कालव्यात पडले. कालव्यातून सध्या उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने प्रवाहाच्या दाबाने ते काही वेळातच दिसेनासे झाले. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूला पोहण्यासाठी आलेले तरुण मदतीसाठी धावले परंतु पुनिया यांचा शोध लागला नाही. याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आल्यानंतर विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवान सोन्याबापू नागरे, भाऊसाहेब आव्हाड, राहुल शिरोळे, योगेश मायनाळे, साईनाथ मिसाळ, मंगेश साळोखे हे कालव्यात पुनिया यांचा शोध घेत आहेत. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही घटनास्थळी थांबून आहेत.
