सिंहगड परिसरात चहुबाजूंनी आग भडकलेली दिसत असून त्याची झळ वन्य जीवांसह संपूर्ण वनसंपदेला बसत आहे
पुणे: सिंहगडाच्या चहुबाजूंनी असलेल्या जंगल परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात आग भडकलेली दिसत असून त्यात झाडे,झुडपे, जनावरांचा चारा, पक्षांची घरटी, लहानमोठ्या जंगली प्राण्यांची पिले व अधिवास नष्ट होत आहे. वन विभाग मात्र ‘जनजागृती’च्या पलीकडे ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. परिणामी आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
दरवर्षी उन्हाच्या झळा वाढू लागल्या की जंगलातील गवत वाळते. सह्याद्रीच्या कुशीत बहुतांश उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वनांचा प्रकार आढळतो. या प्रकारातील झाडांची पाने रुंद असतात व उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन खाली वाळलेल्या पालापाचोळ्याचा खच पडलेला असतो. अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक काही समाजकंटक आग लावून देतात. वाहणारा वारा व वाळलेले गवत, पालापाचोळा यांमुळे आग नियंत्रणाबाहेर जाते व वन विभाग असो वा निसर्गप्रेमी नागरिक यांना पाहत राहण्याच्या पलीकडे काहीही करता येत नाही.
सध्या सिंहगड परिसरामध्ये जंगलांतील आगीमुळे दाहक परिस्थिती दिसत आहे. दुर्गम भाग असल्याने आग नियंत्रणात आणणे जवळपास अशक्य असून पूर्ण जंगल जळून खाक होईपर्यंत ही आग थांबत नाही. यात वनस्पती,प्राणी,पक्षी अशा संपूर्ण वनसंपदेची राखरांगोळी होताना दिसत आहे. केवळ जनजागृती हा यावर उपाय असूच शकत नाही. दरवर्षी होणारा हा गैरप्रकार थांबविण्यासाठी वन विभागाला ठोस प्रतिबंधात्मक उपाय व कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबावाच लागणार आहे. सध्या मात्र वन विभागाकडून ‘बोलाचिच कढी आणि बोलाचाची भात’ यापलीकडे काहीही होताना दिसत नाही.
जाळरेषा ‘डोंगरावर’ की ‘कागदावर’?
जंगलातील आगीला मर्यादित ठेवण्यासाठी जाळरेषा हा एक उपाय आहे. दरवर्षी हा जाळरेषा काढण्याचा कार्यक्रम वन विभागाकडून डोंगरावर कमी पण कागदावर जास्त राबवला जातो. यामध्ये अनेक मजूर कामाला दाखवले जातात, त्यावर मोठा खर्चही दाखवला जातो. जाळरेषा काढतानाचे फोटोही काढले जातात. एवढे सर्व करुनही प्रत्यक्षात मात्र त्याचा प्रभावी उपयोग होताना दिसत नाही. कारण या जाळरेषा उपयुक्ततेचा विचार करुन डोंगरावर कमी कागदावर जास्त काढलेल्या असतात.