The Investigation Express Impact: चोवीस तासांच्या आत महावितरणला सापडला सापडत नसलेला मिटर; पंधरा दिवसांपासून घरात असलेला अंधार दूर झाल्याने पोत्रेकर कुटुंबाने मानले आभार
पुणे: ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधल्यानंतर महावितरणच्या पद्मावती विभागातील कात्रज, गोकुळनगर शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मागील पंधरा दिवसांपासून सापडत नसलेला महेश पोत्रेकर यांचा विज मीटर चोवीस तासांच्या आत सापडला आहे! पंधरा दिवसांपासून घरात असलेला अंधार ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या बातमीच्या दणक्यामुळे दूर झाल्याने पोत्रेकर कुटुंबाने आभार मानले आहेत.
2019 मध्ये घेतलेल्या गोरक्ष स्मृती अपार्टमेंट, बी विंग गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज येथील 501 नंबरच्या सदनिकेत महेश पोत्रेकर पंधरा दिवसांपूर्वी राहण्यास आले. आल्यानंतर त्यांना घरात वीज नसल्याचे लक्षात आले. सदनिकेच्या नंबरच्या ठिकाणी वीज मीटर नसल्याने पोत्रेकर यांनी महावितरणचे कार्यालय गाठले. अनेक वेळा हेलपाटे मारुनही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत होते व तुमचा मीटर कोठे आहे आम्हाला माहीत नाही असे उद्धटपणे बोलत होते.
महेश पोत्रेकर यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. पोत्रेकर यांची सहा महिन्यांची लहान मुलगी घरात वीज नसल्याने रात्रभर झोपत नव्हती. पोत्रेकर कुटुंबाच्या व्यथा व महावितरणचा भोंगळ कारभार द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ने मांडल्यानंतर अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली. आज महावितरणच्या कर्मचाऱ्यांची पोत्रेकर यांचा मीटर शोधून आणून तातडीने बसवून दिला आहे. पोत्रेकर यांच्या घरातील अंधार दूर झाल्याने त्यांनी द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस‘चे आभार मानले आहेत.
कोणी वापरला मीटर?
पोत्रेकर यांचा मीटर मागील काही महिने 407 नंबरच्या सदनिकेसाठी वापरण्यात आल्याचे महावितरणच्याच अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या फोटोतून स्पष्ट दिसत आहे. हे कोणी जाणीवपूर्वक केले होते का याचा शोध महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. दुसऱ्याने वापरलेल्या वीजेचे बिल नाहक पोत्रेकर यांना भरावे लागले आहे.